राहतात नागपुरात : लायसन्स काढले परदेशाचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:11 AM2021-07-14T04:11:06+5:302021-07-14T04:11:06+5:30
नागपूर : परदेशातही भारतीयांना वाहन चालवता यावे म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट (आयडीपी) देते. मागील ...
नागपूर : परदेशातही भारतीयांना वाहन चालवता यावे म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट (आयडीपी) देते. मागील पाच वर्षांत शहर व पूर्व आरटीओ कार्यालये मिळून १८४३ नागपूरकरांनी हे लायसन्स काढले आहे. परंतु मागील दीड वर्षात कोरोनामुळे ‘आयडीपी’ काढण्याऱ्यांची संख्या मंदावली आहे.
नोकरी, शिक्षण किंवा प्रवासाच्या निमित्ताने परदेशात जाणाऱ्या नागरिकांना ‘आयडीपी’ची गरज भासते. पूर्वी हे लायसन्स काढणाऱ्यांची संख्या दोन आकडी होती. परंतु मागील काही वर्षांपासून ती वाढताना दिसून येत आहे. यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पूर्व नागपूरच्या तुलनेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहरात मागील पाच वर्षांत १४५० आंतरराष्ट्रीय लायसन्स काढण्यात आले आहे. तर पूर्व आरटीओमध्ये ३९३ लायसन्स काढले आहेत. परंतु २०१९ पासून सुरू झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परदेशवारी करणाऱ्यांवर निर्बंध आल्याने या लायसन्सच्या संख्येत मोठी घट आली आहे.
-२०१८ मध्ये ५१५ नागरिकांनी काढले लायसन्स
शहर आरटीओ कार्यालयात २०१६ मध्ये २५७ तर २०१८ मध्ये यात वाढ होऊन ५१५ लोकांनी हे आंतरराष्ट्रीय लायसन्स काढले. परंतु २०१९ मध्ये ही संख्या ८४ वर आली. २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने ३० जूनपर्यंत केवळ १३ जणांनीच हे लायसन्स काढले.
-मुदत एक वर्षाचीच
‘इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट’ची मुदत केवळ एक वर्षाचीच आहे. हे लायसन्स काढण्यासाठी
पासपोर्ट आणि व्हिसाची गरज असते. स्थानिक ड्रायव्हिंग लायसन्स आणि व्हिसावरील पत्ता एकसारखा असेल, तरच आंतरराष्ट्रीय परवाना दिला जातो. हे लायसन्स जगभरातील १४९ देशांत ग्राह्य धरले जाते.
-कोरोनामुळे ‘आयडीपी’ची संख्या कमी
कोरोनाच्या निर्बंधामुळे परदेशात जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी, ‘आयडीपी’ची संख्या दोन आकड्यांवर आली आहे. परंतु त्यापूर्वी ५००वर लायसन्स काढले जात होते.
-डॉ. विनोद जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
(ग्राफ)
शहर आरटीओ
२०१६ : २५७
२०१७ : ४९७
२०१८ : ५१५
२०१९ : ८४
२०२० : ८४
२०२१ : १३
(३० जूनपर्यंत)
पूर्व आरटीओ
२०१६ : ९३
२०१७ : ३४
२०१८ : ६८
२०१९ : १४८
२०२० : २७
२०२१:२३
(२३ जुलैपर्यंत)