‘कॅनव्हास’वर माणसांना जिवंत करणारा अवलिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:12 AM2018-11-12T10:12:44+5:302018-11-12T10:14:47+5:30
नागपुरातील युवा कलावंत पराग सोनारघरे याने कॅनव्हासवर साकारलेल्या कलाकृती इतक्या बोलक्या आहेत, की त्या बघितल्यावर आपण नक्कीच म्हणू, खरंच या पेंटिंग आहेत?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुठल्याही कलेला एका आयामाच्या बाहेर न्यायचे असेल, त्यात कलावंताच्या वेगळेपणाचा ठसा उमटवायचा असेल, तर त्या कलेप्रति कलावंताचे समर्पण असले पाहिजे. तेव्हाच तो कलावंत एका वेगळ्या शैलीत रूपात त्या कलाकृतीला रसिकांपुढे मांडून, वाहवा मिळवू शकतो. नागपुरातील युवा कलावंत पराग सोनारघरे याने आपले आयुष्य कॅनव्हासवर झोकून दिले. त्याने कॅनव्हासवर साकारलेल्या कलाकृती इतक्या बोलक्या आहेत, की त्या बघितल्यावर आपण नक्कीच म्हणून खरंच या पेंटिंग आहेत?
बालपणापासून पेंटिंगची आवड परागला होती. सातव्या वर्गात असतानाच त्याने ‘बीएफए’ करण्याचा निर्णय घेतला होता. बारावीनंतर त्याने चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याला कमर्शियल या अप्लाईड आर्टमध्ये बीएफए करायचे होते. परंतु त्याला पेंटिंगमध्ये प्रवेश मिळाला. कला क्षेत्रात बॅचलर डिग्री मिळविल्यानंतर परागने एमएस युनिव्हर्सिटी बडोदा येथून मास्टर आॅफ व्हिज्युअल आर्टस्चे शिक्षण घेऊन प्रॅक्टिस सुरू केली. आज परागने रिकाम्या कॅनव्हासवर साकारलेले चित्र बघितल्यानंतर आपल्याला परागचे कलेप्रति असलेले समर्पण लक्षात येईल.
परागने आपल्या कलेला वेगळा आयाम दिला. त्याने प्रोजेक्टेड इमेज न करता रिअल इमेज साकारण्यावर भर दिला. परागच्या पेंटिंग, पोर्ट्रेट पाहिल्यावर नक्कीच वाटते की हुबेहुब व्यक्ती आपल्यापुढे उभा आहे. परागच्या पेंटिंग दिल्ली, मुंबई, गोवा, अमेरिका, कोरिया, सिंगापूर येथे प्रदर्शित झाल्या आहेत.
या विषयावर काम करतो पराग
पराग मानवी जीवनाचा प्रवास पेंटिंगच्या माध्यमातून व्यक्त करू इच्छितो. बहुतांश पेंटिंगमध्ये व्यक्तीची प्रोजेक्टेड इमेज दाखविली जाते. पण परागच्या पेंटिंगमध्ये व्यक्ती जसा आहे, तसाच कॅनव्हासवर साकारतो. त्याच्या पेंटिंगमध्ये इतके बारकावे आहेत की, त्याची त्वचा, केस, त्याच्या चेहऱ्यावरील भाव जराही पेंटिंग केलेली आहे असे वाटत नाही. त्याचा पेंटिंगचा विषय हा कॉमन मॅन व उपेक्षित वर्गाच्या जीवनावर आधारित आहे.
परफॉर्मन्स आर्टचीही आवड
त्याचबरोबर परागने वेगवेगळ्या शहरात परफॉर्मन्स आर्ट्ससुद्धा केले आहे. त्यांनी नागपूर, भुवनेश्वर, बडोदा, दिल्ली येथे विविध परफॉर्मन्स आर्ट केले आहे. त्याचा या आर्टलासुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भुवनेश्वरमध्ये त्याने पटचित्र पेंटरच्या सोबत शरीरावर पेंटिंग करून शहरात वॉक केला होता. त्याचसोबत इंटरनॅशनल आर्टिस्ट असो. दिल्ली व बडोदा येथेसुद्धा वेगवेगळे परफॉर्मन्स आर्ट केले आहे.