जमिनीचा महसूल गोळा करणाऱ्या विभागावर १३२ कामांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:08 AM2021-08-01T04:08:24+5:302021-08-01T04:08:24+5:30

नागपूर : स्वातंत्र्यपूर्व काळात महसूल विभागाकडे जमाबंदी, न्यायिक व महसूल या जबाबदाऱ्या होत्या. स्वातंत्र्योत्तर काळात शासनाने कल्याणकारी राज्याची ...

Load of 132 works on land revenue collection department | जमिनीचा महसूल गोळा करणाऱ्या विभागावर १३२ कामांचा भार

जमिनीचा महसूल गोळा करणाऱ्या विभागावर १३२ कामांचा भार

googlenewsNext

नागपूर : स्वातंत्र्यपूर्व काळात महसूल विभागाकडे जमाबंदी, न्यायिक व महसूल या जबाबदाऱ्या होत्या. स्वातंत्र्योत्तर काळात शासनाने कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारल्याने नवीन जबाबदाऱ्या महसूल विभागाकडे सोपविण्यात आल्या. आता महसूलच्या कामाव्यतिरिक्त विकासात्मक कामांचीही जबाबदारी या विभागाकडे देण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध विभागांच्या समन्वयाची व संनियंत्रणाची जबाबदारीदेखील महसूल विभागावर सोपविण्यात आली आहे. काळानुरूप जबाबदाऱ्या बदलल्याने जमिनीचा महसूल गोळा करणाऱ्या या विभागावर आता १३२ प्रकारच्या कामांच्या जबाबदाऱ्या आल्या आहेत.

शासनाचा मध्यवर्ती विभाग म्हणून कार्यरत असलेल्या महसूल विभागाचे कार्य जमीन महसूल अधिनियम व सुव्यवस्था राखणे या उद्देशाने सुरू झाला होता. सध्या विभागाकडे गौण खनिज स्वामित्वधन, अनधिकृत कारवाई, करमणूक कर, विविध खात्यांची थकीत वसुली, पाणी वापर परवानगी, रस्ता देणे, पाइपलाइन परवानगी, सर्व प्रकारच्या निवडणुका, जनगणना, आर्थिक गणना, कृषी गणना, आधार कार्ड, विविध सामाजिक योजना, रोजगार हमी योजना, जात, रहिवासी, मिळकत ऐपत, राष्ट्रीयत्व, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी दाखला, भूमिहीन, अल्पभूधारक आदी प्रमाणपत्रे, पाणी/चारा टंचाई सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, मोर्चा, उपोषण, रास्ता रोको यासह शासनाकडून जे कोणतेही मोठे अभियान राबविले जाते त्याची जबाबदारी महसूल विभागावर असते. कामाच्या जबाबदाऱ्या वाढल्या असल्या तरी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कामाचा ताण विभागावर वाढला आहे.

- महसूल वर्ष १ ऑगस्ट ते ३१ जुलै

जसे आर्थिक वर्षाची सुरुवात १ एप्रिलला होते तसे महसूल वर्षाची सुरुवात १ ऑगस्ट रोजी होते. १ ऑगस्ट ते ३१ जुलै या कालावधीच्या शेवटी वर्षभरातील महसूल आकारणी व वसुलीचा ताळमेळ साधण्याचे काम महसूल यंत्रणेकडून केले जाते. त्यामुळे १ ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून पाळला जातो.

- कोरोनाच्या काळात स्वीकारल्या जबाबदाऱ्या

कामाचे स्वरूप बदलले आहे. इतरही जबाबदाऱ्या आल्यामुळे खऱ्या अर्थाने महसूलचे जे काम आहे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. कोरोनाच्या काळात तर महसूल विभागाने भरपूर कामे केली. ग्रामीण भागात कंटेन्मेंट झोन तयार करण्यापासून कोविड केअर सेंटर तयार करणे, आरोग्य व्यवस्थेला सहकार्य करणे, लॉकडाऊनच्या काळात अन्नछत्र चालविण्यापासून स्थलांतरित मजुरांच्या सोयीसुविधा करण्यापर्यंत मंडळ अधिकारी, तलाठी, तहसीलदारांनी कामे केली आहेत.

- महसूलव्यतिरिक्त इतर चॅलेंजेस आहेत आणि विभाग यशस्वी तोंड देत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा समावेश मोठ्या प्रमाणात झाला आहे. टेक्नॉलॉजीचा वापर वाढला आहे. इतर विभागांच्या जबाबदाऱ्या महसूल विभाग सांभाळतो आहे; पण मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे.

अशोक नारनवरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मोफेशियल स्टेनोग्राफर कर्मचारी संघटना

Web Title: Load of 132 works on land revenue collection department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.