एका कर्मचाऱ्यावर पाणी व स्वच्छता विभागाचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:09 AM2021-03-18T04:09:23+5:302021-03-18T04:09:23+5:30
कळमेश्वर : कळमेश्वर पंचायत समितीमधील पाणी व स्वच्छता विभागातील तीनपैकी दोन पदे रिक्त आहेत. एकाच कंत्राटी कर्मचाऱ्यावर तालुक्यातील कामाचा ...
कळमेश्वर : कळमेश्वर पंचायत समितीमधील पाणी व स्वच्छता विभागातील तीनपैकी दोन पदे रिक्त आहेत. एकाच कंत्राटी कर्मचाऱ्यावर तालुक्यातील कामाचा भार आलेला आहे. त्यामुळे तालुक्यात पाणी व स्वच्छतेविषयी कामे करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे. पंचायत समितीमधील पाणी व स्वच्छताविषयक कामे करण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागात तीन पदे मंजूर आहेत. यात गट समन्वयकाचे एक पद मंजूर असून, ते २०१६ पासून रिक्त आहे. समूह समन्वयक दोन पदे मंजूर असून, यापैकी एक पद मागील दोन वर्षापासून रिक्त आहे. यामुळे या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा भार सध्या कार्यरत कंत्राटी समूह समन्वयक लुकेश राणे यांच्यावर आहे. या विभागामार्फत तालुक्यातील वैयक्तिक शौचालय बांधकाम, जल जीवन मिशनअंतर्गत नळ जोडणी, सार्वजनिक शौचालय बांधकाम, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता हीच सेवा मोहीम, स्वच्छ सर्वेक्षण, गावस्तरावरील शाळा-अंगणवाडीमध्ये नळ जोडणी, शौचालय बांधकामाचे निधी वितरण करणे, आदी उपक्रम राबविले जातात. हे उपक्रम राबविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचविण्यासाठी अडचण निर्माण होते. तसेच संबंधित कर्मचाऱ्याला प्रसंगी नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागते. यामुळे शासनाचा स्वच्छताविषयक उद्देश कळमेश्वर तालुक्यात यशस्वी कसा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.