एकाच भूखंडावर तीन बँकांकडून कर्ज
By Admin | Published: May 21, 2017 02:28 AM2017-05-21T02:28:52+5:302017-05-21T02:28:52+5:30
एकाच भूखंडावर तीन वेगवेगळ्या बँकांमधून कर्ज काढले जाते. बँक अधिकारी डोळेझाकपणे कर्ज देतात अन् आरोपी लाखोंची रक्कम लाटतात.
सारेच संशयास्पद : बनवाबनवी उघड, गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकाच भूखंडावर तीन वेगवेगळ्या बँकांमधून कर्ज काढले जाते. बँक अधिकारी डोळेझाकपणे कर्ज देतात अन् आरोपी लाखोंची रक्कम लाटतात. वर्षभरानंतर हा गैरप्रकार उघडकीस येतो अन् नंतर एमआयडीसी पोलीस गुन्हा दाखल करतात. सारेच कसे संशयास्पद वाटणारे हे प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.
लाखनी (जि. भंडारा) जवळच्या सलोटी येथील रहिवासी श्रीधर रामभाऊ ताकमोडे याने मौजा वाठोडा येथील २०२ क्रमांकाचा भूखंड विकत घेण्यासाठी कर्ज हवे म्हणून एमआयडीसीतील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत काही महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. बँक अधिकाऱ्यांनी या भूखंडांची कागदपत्रे तारण ठेवून ताकमोडेला १५ लाख, ७५ हजारांचे कर्ज दिले. त्यानंतर ताकमोडेने याच भूखंडाचे दुसरे एक विक्रीपत्र इंडियन ओवरसीज बँक, हुडकेश्वर येथे गहाण ठेवून १६ लाख, ८० हजारांचे कर्ज घेतले. त्यानंतर तुळशीराम गणपत बारापात्रे (रा. पंचतारा सोसायटी, सोमलवाडा) याने याच भूखंडाची आरोपी ताकमोडेला विक्री केल्याचे दाखवून ते विक्रीपत्र पंजाब सिंध बँकेत तारण ठेवले आणि तेथून १९ लाखांचे कर्ज घेतले.
विशेष म्हणजे, या तीनही प्रकरणात मिळालेली संपूर्ण रक्कम आरोपी बारापात्रेच्या खात्यात जमा झाली. त्यावरून बारापात्रेने ताकमोडेसोबत संगनमत करून वेगवेगळ्या इसमांना या भूखंडांची विक्री केल्याचे दाखवून तीन बँकांना ५१ लाख, ५५ हजार रुपयांचा गंडा घातला. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर संतोष देवीदास देशपांडे (वय ५७, रा. कादंबिनी विहार, स्वामी समर्थ मंदिरजवळ हुडकेश्वर) यांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्यावरून आरोपी बारापात्रे आणि ताकमोडेविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील चौकशी सुरू आहे.
आणखी कुणाचा सहभाग ?
विशेष असे की, आरोपींनी एकाच भूखंडाची तीन वेळा वेगवेगळ्या पद्धतीने खरेदी विक्री केल्याचे दाखवून चक्क ५१ लाख, ५५ हजारांचे कर्ज उचलले. आॅनलाईन बँकिंग सिस्टिम आणि हायटेक बँकिंगचा दावा करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांनी कर्ज कसे उपलब्ध करून दिले, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या बनवाबनवीत कुणी बँक अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा समावेश आहे का, या प्रश्नाचेही पोलीस उत्तर शोधत आहेत.