पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ‘लॉबिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:11 AM2021-09-06T04:11:31+5:302021-09-06T04:11:31+5:30

जगदीश जोशी नागपूर : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यात होत असलेली ‘लॉबिंग’ कमी होताना दिसत नाही. या अवस्थेमुळे बदलीची वाट ...

'Lobbying' in police officer transfers | पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ‘लॉबिंग’

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ‘लॉबिंग’

Next

जगदीश जोशी

नागपूर : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यात होत असलेली ‘लॉबिंग’ कमी होताना दिसत नाही. या अवस्थेमुळे बदलीची वाट पाहत असलेले अधिकारी चिंतेत सापडले आहेत. मेरीटच्या दावेदारांना जुगाड लावणारे अधिकारी बाजी मारतात काय ही चिंता भेडसावत आहे, तर जुगाड लावणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले जाण्याची शंका वाटत आहे. आता सर्व अधिकारी बदल्यांची फाईल कधी फायनल होते, याची वाट पाहत आहेत.

जवळपास तीन महिन्यांपासून पोलीस उपायुक्त आणि अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रलंबित आहेत. सुरुवातीला तर अधिकारी कॅबिनेटच्या बैठकीसह मंत्रालयात होणाऱ्या लहानमोठ्या हालचालीवर नजर ठेऊन होते. दरम्यान, अनेक प्रशासकीय (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. परंतु, आयपीएस तसेच स्टेट कॅडरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र वाटच पाहावी लागत आहे. सूत्रांनुसार गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आतापर्यंत अनेकदा बैठकी झाल्या असून, त्यात तासनतास चर्चा होऊन बदल्यांची यादी तयार करण्याचे ठरविण्यात आले. परंतु दुसऱ्याच क्षणी त्यात बदल करण्याचा आदेश आल्यामुळे पुन्हा फेरबदल करण्याची कसरत सुरू करण्यात येत होती. गेल्या महिनाभरापासून गृह मंत्रालयात हेच सुरू आहे. २० ते २५ वेळा लहान-मोठे बदल करण्याच्या नावाखाली बदल्यांची यादी अडकून ठेवण्यात आली. यादीत कोणते बदल केले याची कोणालाही भणक लागू देण्यात आली नाही. पहिल्यांदा अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मेरीटचे दावेदार असलेल्या अधिकाऱ्यांना चिंता वाटत आहे. बदल्यांच्या या घोळात जुगाड लावण्यात सक्रिय असलेल्या अधिकाऱ्यांचा हात असल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या बदल्यात नागपुरात आलेल्या दोरजे दाम्पत्य आणि दोन इतर बदल्या वगळता बहुतांश बदल्यात जुगाड लावण्यात आल्याचे दिसून येते. बदली करण्यास इच्छुक अधिकारी मुंबईत आणि आपल्या ओळखीच्या मोठ्या व्यक्तींच्या संपर्कात आहेत. दोन महिन्यांपासून एखादाच अधिकारी असा असेल ज्याने सुट्टी घेऊन बदलीसाठी प्रयत्न केला नसेल. जुगाड लावत असलेले अधिकारी तर दर दोन दिवसाला सुट्टी घेऊन मोठ्या पदावरील व्यक्तींकडे चकरा मारत आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि डीजीपी संजय पांडे हे स्वच्छ प्रतिमेचे म्हणून ओळखले जातात. बदलीची प्रक्रिया त्यांच्या नजरेखाली होणार आहे. यामुळे मेरीटवाल्या अधिकाऱ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु, सातत्याने बदल बदल्यांची यादी अडकून पडत असल्यामुळे त्यांनाही चिंता वाटत आहे.

............

बदलले जाऊ शकतात महासंचालक

आगामी काही दिवसांत पोलीस महासंचालक संजय पांडे हे बदलल्या जाण्याची शंका आहे. युपीएससीने पांडे यांच्या ठिकाणी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे महासंचालक पदासाठी सुचविली आहेत. यात रश्मी शुक्ला, के. व्यंकटेशम आणि रजनीश सेठ यांचा समावेश आहे. प्रतिनियुक्तीवर गेलेल्या रश्मी शुक्ला यांच्या बाबतची भूमिका सर्वांनाच माहीत आहे. व्यंकटेशम यांनाही नियुक्तीची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत रजनीश सेठ यांच्या नावाची चर्चा आहे.

.......

Web Title: 'Lobbying' in police officer transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.