अवीट चवीचा गावरान आंबा काळाच्या ओघात हद्दपार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 07:21 PM2022-03-28T19:21:01+5:302022-03-28T19:21:37+5:30
Nagpur News इतर क्षेत्रातून येणाऱ्या आंब्याचे वाढलेले महत्त्व आणि त्या क्षेत्रातील आंब्याचे झालेले ब्रॅण्डिंग यामुळे गावरान आंब्याचे महत्त्व आपसूकच घटले.
नागपूर : गावाकडच्या शेतशिवारातील पाडावर फुलणारा गावरान आंबा, आता केवळ इतिहास ठरला आहे. गावातून शेतांकडे जाणाऱ्या पांदण रस्त्यावर उन्हाळ्यात गार सावली देणारे, हे गावरान आंब्याचे वृक्ष आता केवळ स्वप्न ठरले आहे. आर्थिक निकष आणि कृषी उत्पन्न यातील गणितात गावरान आंब्याचे वृक्ष बसत नसल्याने, ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच, गावरान नावाचा लुसलुसित आंबा जिल्ह्यातून हद्दपार झाला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
जिल्ह्यात आंब्याच्या बागा नाहीतच
नागपूर जिल्ह्यात आंबा, हे मुद्दामहून लावले जाणारे वृक्ष नाही किंवा आंब्याच्या बागा फुलविण्याचा विचार येथील शेतकरी करत नाही. धुऱ्यावर, रस्त्याच्या काठावर खाल्लेल्या आंब्याच्या घुया फेकल्यानंतर स्वत:च उगवलेले आणि मोठे झालेले वृक्ष, अशी जिल्ह्यातील स्थिती आहे. अशा तऱ्हेने नागपूर जिल्ह्यात साधारणतः एक हजार हेक्टरवर आंबे उभे असलेले दिसतात.
गावरान आंब्याचे क्षेत्र घटले
१. इतर क्षेत्रातून येणाऱ्या आंब्याचे वाढलेले महत्त्व आणि त्या क्षेत्रातील आंब्याचे झालेले ब्रॅण्डिंग यामुळे गावरान आंब्याचे महत्त्व आपसूकच घटले.
२. गावरान आंब्याला किंमत कमी मिळत असल्याने, शेतकऱ्यांनी ही झाडे तोडून टाकली व त्याऐवजी कलमी आंब्याची झाडे लावण्यास सुरुवात केली.
३. आंब्याचे झाड मोठे असल्याने, सावलीही मोठी होते. सावलीमुळे आंतरिक पीक घेणे कठीण जाते. म्हणून आंब्याची झाडे उभी राहू नयेत, असाच प्रयत्न असतो.
नागपूरकरांना आवडतो आंबा
१. नागपूरकरांना बैगन फल्ली, नीलम व दसेरी हा आंबा प्रचंड आवडतो. शिवाय, या आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असतात.
२. अत्यंत महाग असल्याने हापूस, केसर हा आंबा श्रीमंतांचा आंबा म्हणून ओळखला जातो. आर्थिकदृष्ट्या उत्तम असणाऱ्यांकडेच हा आंबा चवीने घेतला जातो.
३. नागपुरात येणारा रत्नागिरी येथील हापूस आंबा सेकंड ग्रेडचा असतो. फर्स्ट ग्रेडचा आंबा विक्रीला कधीच उपलब्ध नसतो.
गरिबांचा आंबाही महाग
पिकलेल्या आंब्याचा हा सीझन नसल्याने आणि आवक कमी असल्याने गरिबांचा आंबा म्हणून ओळख असलेले नीलम, बैगन फल्ली, दसेरी हे आंबेही प्रचंड महाग आहेत. १५० ते २०० रुपये किलो असे दर आहेत. गुढीपाडव्यानंतर आवक वाढली की दर कमी होतील.
माचवून खाण्याच्या गावरान आंब्याची गोडीच वेगळी
गावरान आंबा हा आकाराने लहान असतो. त्यामुळे, माचवून माचवून त्याचा रस पिण्याची गोडी वेगळीच असते. या आंब्याचा रसही विनापाणी मिसळून खाल्ला जातो. हा आंबा आजही गडचिरोली आदी भागातून मागवण्यावर अनेकांचा भर असतो.
* झाडांमुळे माकडांचा उपद्रव प्रचंड असतो आणि त्यामुळे, शेतातील उभ्या पिकांची नासधूस होते. म्हणून आंब्याची झाडे लावली जात नाहीत.
- अनिल मोवाडे, शेतकरी (सावनेर)
* इतर झाडांच्या तुलनेत आंब्याचा घेर मोठा असतो आणि सावलीही मोठी असते. त्यामुळे, पीक घेण्यास अडचण येते.
- मधुसूदन तलमले, शेतकरी (खात)
...................