संजीवनी ठरू शकते लोकल रेल्वे
By admin | Published: May 23, 2016 02:55 AM2016-05-23T02:55:40+5:302016-05-23T02:55:40+5:30
उपराजधानीच्या शहर सीमेत वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर शहरालगत असलेल्या लहान शहरांचा देखील पसारा झपाट्याने वाढत आहे.
रेल्वे ट्रॅकचे जाळे वाढतेय : मागणी वाढल्यास होऊ शकतो उपराजधानीत विचार
नागपूर : उपराजधानीच्या शहर सीमेत वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर शहरालगत असलेल्या लहान शहरांचा देखील पसारा झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे या शहरांना जोडणाऱ्या रेल्वे लाईनचे जाळेही वाढत आहे. भविष्यात नागपूरकरांचा मुंबईच्या धर्तीवर लोकल रेल्वेची सुविधा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेट्रो रेल्वेची सेवा मर्यादित मार्गांवर व मर्यादित अंतरापर्यंतच असणार आहे. अशा परिस्थितीत लोकल रेल्वे नागपूरसाठी कमी खर्चात प्रवास घडविणारी संजीवनी ठरू शकते.
मंडल रेल प्रबंधक कार्यालयाने यापूर्वी या आशयाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, रेल्वे ट्रॅक उपलब्ध नसल्यामुळे या प्रस्तावावर गांभीर्याने विचार झाला नाही. आता मात्र चित्र बदलत आहे. नागपूर- वर्धा दरम्यान तिसरीच नव्हे तर चौथी लाईन उभारण्याचा प्रस्ताव तयार होत आहे. नागपूर- कळमना ही लाईन डबल केली जात आहे. इतवारी येथे देखील दोन लूप लाईन तयार केल्या जातील. नागपूर- छिंदवाडा ब्रॉडगेज लाईनचे काम सुरू आहे. गोधनी येथे दोन कार्ड लाईन आहेत. त्यामुळे अतिरिक्त रेल्वे गाड्या चालविण्याची शक्यता वाढली आहे. सद्यस्थितीत शहराच्या चारही दिशेने २५ किलोमीटर अंतरावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कर्मचारी, व्यापारी, कामगार, विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. सध्यस्थितीत या सर्वांना एसटी बस, खासगी बस, सहा आसनी आॅटो किंवा इतर दुसऱ्या खासगी वाहनांवर अवलंबून रहावे लागते. रस्ता मार्गे प्रवास करणे महागडे व तुलनेत धोकादायकही असते. जाणकारांच्या मते कन्हान, कामठी, कळमना, इतवारी, नागपूर, अजनी, गोधनी, सावनेर, बुटीबोरी, कळमेश्वर या शहरांना जोडणारी कमी डब्यांची लोकल रेल्वे चालविण्याची नितांत गरज आहे. (प्रतिनिधी)