गर्भवतींनी सोडली वस्ती : त्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 09:15 PM2020-09-19T21:15:40+5:302020-09-19T21:17:04+5:30
शहरातील बहुतेक भागातील रस्त्यांची दुर्दशा झालेली असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. कधी मुदत संपल्याने तर कुठे वेगवेगळ्या बांधकामामुळे रस्ते खराब झाले आहेत. घोगली रोडवरील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा जीवघेणा प्रवास झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील बहुतेक भागातील रस्त्यांची दुर्दशा झालेली असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. कधी मुदत संपल्याने तर कुठे वेगवेगळ्या बांधकामामुळे रस्ते खराब झाले आहेत. घोगली रोडवरील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा जीवघेणा प्रवास झाला आहे. पिरॅमिड सिटी या पॉश वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांनी ही व्यथा लोकमतजवळ मांडली आहे. वसाहतीचा रस्ता अक्षरश: ओबडधोबड झाला आहे. या रस्त्याची एकूण लांबी ७५० मीटर आहे. ३५० मीटरचे सिमेंटीकरण झाले आहे पण उरलेला ३५० मीटर पार करणे दिव्य पार करण्यासारखे आहे. काही महिन्यांपूर्वी एका शाळेच्या बांधकामासाठी होणाऱ्या जड वाहतुकीमुळे रस्त्याची दुरावस्था झाली. वाहन चालविणे सोडा, पायी चालणेही दुरापास्त झाले आहे. दररोज एकतरी दुर्घटना होते किंवा वाहने खराब होतात. काहीच दिवसांपूर्वी एक महिला अपघात झाल्यानंतर कोमामध्ये गेली होती. याबाबत अधिकारी व लोकप्रतिनिधींनाही तक्रार केली होती पण कुणीही गंभीरतेने घेतले नाही. येथील नागरिक बऱ्याच महिन्यांपासून हा त्रास सहन करीत आहेत. पावसाळ्यात तर बेहाल झाल्याचे लोकांनी सांगितले. अवस्था अशी आहे की वस्तीतील गर्भवती महिलांनी नियमित तपासायला जाताना धोका होण्याची शक्यता लक्षात घेत वस्ती सोडून इतर ठिकाणी खोली करण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. त्यामुळे रस्त्याची समस्या कोण सोडविणार, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
श्रमदानाचा निर्णय
प्रशासनाची यंत्रणा किंवा जनप्रतिनिधी गांभीर्याने घेत नसल्याने त्रस्त झालेल्या रहिवाशांनी आता स्वत:च पुढे येऊन रस्ता दुरुस्तीसाठी श्रमदान करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी सर्व नागरिक मिळून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेणार असल्याचे निवेदनातून सांगण्यात आले.