१५ महिन्यांपासून लॉकडाऊन; कदाचित सिंगल स्क्रीन थिएटर्स पुन्हा दिसणार नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 08:51 AM2021-06-02T08:51:49+5:302021-06-02T08:52:22+5:30

Nagpur News गेल्या १५ महिन्यांपासून चित्रपटगृहे बंद असल्याने मालकांसोबतच मॅनेजर, तिकीट कलेक्टर, सफाई कर्मचारी, वाहनतळ कर्मचारी आदींची वाताहत झाली आहे. अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स कदाचित पुन्हा दिसणार नाहीत, अशी स्थिती आहे.

Lockdown for 15 months; Maybe single screen theaters won't show up again! | १५ महिन्यांपासून लॉकडाऊन; कदाचित सिंगल स्क्रीन थिएटर्स पुन्हा दिसणार नाहीत!

१५ महिन्यांपासून लॉकडाऊन; कदाचित सिंगल स्क्रीन थिएटर्स पुन्हा दिसणार नाहीत!

googlenewsNext

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्राला आणि देशाला सगळ्यात जास्त करमणूक कर देणारी एंटरटेन्मेंट इंडस्ट्री कोरोनाने नेस्तनाबूत केली आहे. या इंडस्ट्रीचा सगळ्यात मजबूत असा कणा समजल्या जाणाऱ्या चित्रपटगृहांचे दिवाळे लॉकडाऊनने काढले आहे. गेल्या १५ महिन्यांपासून चित्रपटगृहे बंद असल्याने मालकांसोबतच मॅनेजर, तिकीट कलेक्टर, सफाई कर्मचारी, वाहनतळ कर्मचारी आदींची वाताहत झाली आहे. अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स कदाचित पुन्हा दिसणार नाहीत, अशी स्थिती आहे.

शहरात मुख्य धारेतील चित्रपट प्रदर्शित करणारी २०च्यावर चित्रपटगृहे आहेत. सिंगल स्क्रीन थिएटर्ससोबतच मल्टिप्लेक्स व मिनीप्लेक्सचा समावेश होतो. विशेष म्हणजे, शहराचा वाढता आवाका व मनोरंजन क्षेत्राकडे नागरिकांचा वाढता कल बघता अनेक मिनीप्लेक्स थिएटर्सची पायाभरणीही झाली आहे. सगळे सुरळीत होत असतानाच कोरोनाचे आक्रमण झाले आणि देशभरात टाळेबंदी सुरू झाली. मार्च २०२० पासून सुरू झालेली ही टाळेबंदी चित्रपटगृहांसाठी अद्यापही उघडलेली नाही. वेगवेगळ्या राज्यांत थोड्याथोडक्या प्रमाणात मुभा मिळाली असली तरी चित्रपटक्षेत्र एका राज्यापुरते किंवा एका शहरापुरते नसल्याने ती मुभा उसंत देणारी नव्हती. त्याचा फटका अद्यापही बसत आहे. सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे बंद असली तरी वीजबिल, पाणीबिल, दररोजचा मेण्टेनन्स, साफसफाई आणि करभरणी नियमित सुरूच आहे. काही चित्रपटगृह मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही काढलेले नाही. मात्र, उत्पन्नच नसल्याने अनेकांचे पगार कमी केले आहेत तर काहींना पर्याय नसल्याने कर्मचाऱ्यांना मोकळी वाट केली आहे. काहींनी तर चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे.

अनलॉकही तारू शकले नाही

मार्च २०२० पासून सुरू झालेले लॉकडाऊन सिनेमागृहांसाठी नोव्हेंबरपर्यंत कायम होते. जागतिक रंगभूमी दिनाची भेट देत महाराष्ट्र सरकारने मनोरंजन क्षेत्राला अनलॉक केले होते. मात्र, प्रारंभी २५ टक्के व नंतर ५० टक्के आसनक्षमता मारक ठरली. शिवाय, प्रेक्षकांना खेचू शकणारे सिनेमे प्रदर्शित झाले नाहीत. सूरज पे मंगल भारी, विजय दी मास्टर हे सिनेमे नागपुरात रीलिज झाले. पण, आठवड्याच्यावर चालू शकले नाहीत. काही थिएटर्सनी जुने सिनेमे लावले. मात्र, त्याचाही फायदा झाला नाही. फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि थिएटर्स पुन्हा बंद पडले.

ओटीटी विरुद्ध चित्रपटगृहे

लॉकडाऊन काळात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण रखडले होते. ते पूर्ण झाल्यावरही प्रेक्षकांची शाश्वती नसल्याने अनेकांनी ओटीटीवर आपले सिनेमे प्रदर्शित करून नफा कमावला. मात्र, त्याचा फटका चित्रपटगृहांना बसला. लक्ष्मी, राधे सारख्या चित्रपटांनीही ओटीटीचाच पर्याय निवडला. रुही अब्जा, मुंबई सागासारखे चित्रपट नागपुरात प्रदर्शित होऊच शकले नाहीत. जे सिनेमे प्रदर्शित करण्याचा धोका चित्रपटगृहांनी स्वीकारला. त्यातही प्रेक्षकांनी पाठ दाखविल्याने खर्चाचा मार जादा बसला.

शासनाने सहा महिन्यांची सवलत द्यावी

कोरोना संक्रमणामुळे गेल्या १५ महिन्यांपासून सगळ्यात जास्त तोटा कुणाचा झाला असेल तर तो चित्रपटगृहांचा. उत्पन्न बंद आणि खर्च सुरू, अशी स्थिती आहे. शासनाने या संकटापासून काढण्यासाठी किमान प्रत्येक गोष्टीत सहा महिन्यांची सवलत देणे अपेक्षित आहे. हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कर देणारे आहे, हे शासनाने समजून घ्यावे.

- प्रतीक मुणोत, संचालक, पंचशिल सिनेमा

चित्रपटगृहे हा पॅन इंडियाचा प्रश्न

नागपुरात अनलॉक झाले म्हणजे चित्रपटगृहांना चांगले दिवस येतील, असे नाही. चित्रपटगृहे हा पॅन इंडियाचा प्रश्न आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यावर चित्रपटगृहांचे भविष्य आहे. मात्र, अजूनही शासन निर्देश स्पष्ट नाहीत. या क्षेत्रावर पेंटर्स, बॅनर क्रिएटर्स, डिस्ट्रिब्युटर्स निर्भर आहेत. त्याचा विचार सरकारने करावा.

- राजेश राऊत, व्यवस्थापक, कार्निव्हल सिनेमा

सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद पडण्याच्या मार्गावर

लॉकडाऊनमुळे सिंगल स्क्रीन थिएटर्स अनेकांनी बंद करून दुसरा व्यवसाय निवडण्याचा प्रयत्न केला आहे. अनलॉक झाल्यावर कदाचित नियमित दिसणारी थिएटर्स पुन्हा दिसणार नाहीत, अशी स्थिती आहे. काहींनी तग धरला असला तरी आगामी काळात त्यांना कायमचे टाळे लागण्याची चिन्हे आहेत. हे नुकसान एका मालकाचे नाही तर अनेकांच्या रोजगाराचे असणार आहे.

- आलोक तिवारी, मालक, जानकी सिनेमा

..........................

Web Title: Lockdown for 15 months; Maybe single screen theaters won't show up again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.