वैवाहिक जीवनातही विष कालवत आहे लॉकडाऊन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:06 AM2021-06-05T04:06:31+5:302021-06-05T04:06:31+5:30
जगदीश जोशी नागपूर : लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक टंचाईमुळे वैवाहिक जीवनात विष कालवण्याचा प्रकार घडत आहे. टीव्ही ...
जगदीश जोशी
नागपूर : लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक टंचाईमुळे वैवाहिक जीवनात विष कालवण्याचा प्रकार घडत आहे. टीव्ही पाहणे, बाथरूममध्ये अधिक वेळ घालविणे, मनासारखे भोजन तयार न करणे यासारख्या लहानसहान बाबींवरून भांडणे होत असल्यामुळे पती-पत्नी पोलिसांकडे धाव घेत आहेत. दोन-चार महिन्यांपासून बेरोजगारीचा सामना करीत असलेल्या पतीला पत्नी सहन करू शकत नसल्याचे चित्र आहे. ती घटस्फोट घेण्याच्या हेतूने पोलिसांकडे धाव घेत आहे. भरोसा सेल त्यांची समजूत घालून त्यांच्या समस्यांचे निराकरण करीत आहे.
कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे सर्वजण संकटाचा सामना करीत आहेत. केवळ नोकरदार वर्ग आर्थिक संकटापासून दूर आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक घरात बंदिस्त आहेत. मुलेही ऑनलाईन क्लासच्या भरवशावर आहेत. कुणी नोकरी गेल्यामुळे बेरोजगार झाला आहे तर कुणी वेतन कमी मिळत असल्यामुळे त्रस्त आहे. लहान मोठे व्यवसायही ठप्प झाले आहेत. या बाबींचा मानसिक परिणाम होत आहे. हताश झालेले नागरिक पत्नी किंवा मुलांवर आपला राग व्यक्त करीत आहेत. यामुळे घरात भांडणांचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीत पती-पत्नीत विनाकारण वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. पती जी मालिका पाहतो ती मालिका पत्नीला आवडत नाही. पती दिवसभर भोजन आणि नाश्त्यात वेगवेगळे पदार्थ करून देण्याची इच्छा व्यक्त करतो. ही बाब पत्नीला सहन होत नाही. आई-वडील बाथरूममध्ये अधिक वेळ लावतात. सुनेच्या वागणुकीमुळे नाराज आईवडिलांच्या गोष्टी आगीत तेल टाकण्याचे काम करीत असून हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचत आहे. पती-पत्नीमधील वाद सोडविण्यासाठी भरोसा सेल कार्यरत आहे. भरोसा सेल पती-पत्नीमध्ये मध्यस्थी करून त्यांचे भांडण सोडवितो. लॉकडाऊनमध्येही भरोसा सेलमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झालेली नाही. मागील दोन महिन्यात एप्रिल आणि मेमध्ये भरोसा सेलला २६० तक्रारी मिळाल्या. अनेक तक्रारीवरून पती-पत्नीत घरगुती वादामुळे भांडणे झाल्याचे उघड झाले आहे. अनेक पती, पत्नी आई-वडील किंवा भाऊ-बहिणीसोबत बोलल्यामुळे नाराज होतात. कामावर गेल्यामुळे पत्नीला कुटुंबीयांसोबत बोलण्याची संधी मिळते. लॉकडाऊनमुळे घरात असलेल्या पतीपासून ही बाब लपत नाही. यामुळे दोघात वाद होतो. अनेक पती मोबाईलवर किंवा शेजारी जाऊन बोलल्यामुळे पत्नीवर आरोप करीत आहेत. अनेक प्रकरणात माहेरी गेल्यामुळे पतीने पत्नीला घरात ठेवण्यास मनाई केली आहे. तर अनेक महिला कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या पतीवर नाराज होऊन घटस्फोट घेण्यासाठी भरोसा सेलमध्ये पोहोचल्या आहेत. त्यांच्या मते घरखर्च भागविणे कठीण होत आहे. दोन वेळचे भोजन आणि मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. बेरोजगार पतीपेक्षा त्या मुलांसोबत वेगळे राहण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत.
.........
वर्षभरात आल्या ७५० तक्रारी
लॉकडाऊन सुरू होऊन सव्वा वर्ष झाले आहे. तरीसुद्धा भरोसा सेलमध्ये येणाऱ्या तक्रारींची संख्या कमी झालेली नाही. सव्वा वर्षात सेलला ७५० तक्रारी मिळाल्या आहेत. बहुतांश तक्रारीत भरोसा सेलने पती-पत्नीचे भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला आहे. भरोसा सेलच्या प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक रेखा संखपाळे यांनी सांगितले की, त्यांचा उद्देश पती-पत्नीला मार्गदर्शन करून त्यांचे भांडण मिटविण्याचा असतो. लॉकडाऊनमुळे पती-पत्नी दोघेही त्रस्त आहेत. त्यामुळे लहानसहान बाबींवरून त्यांच्यात वाद होत आहेत. संयम आणि समजूतदारपणा बाळगण्याचा सल्ला देऊन त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
............