पुन्हा लॉकडाऊन, आर्थिक नुकसान कसे सोसायचे? व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 08:29 PM2021-04-29T20:29:23+5:302021-04-29T20:30:55+5:30

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने १५ दिवसांसाठी १ मेपासून पुन्हा कडक निर्बंध लादलेले आहे. ३० एप्रिलनंतर निर्बंध शिथिल होतील, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना होती. पण पुन्हा लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे व्यावसायिक निराश झाले आहेत.

Lockdown again, how to bear the financial loss? Billions of rupees lost to traders | पुन्हा लॉकडाऊन, आर्थिक नुकसान कसे सोसायचे? व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

पुन्हा लॉकडाऊन, आर्थिक नुकसान कसे सोसायचे? व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

Next
ठळक मुद्दे आर्थिक संकटातील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचा सवाल


लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने १५ दिवसांसाठी १ मेपासून पुन्हा कडक निर्बंध लादलेले आहे. ३० एप्रिलनंतर निर्बंध शिथिल होतील, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना होती. पण पुन्हा लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे व्यावसायिक निराश झाले आहेत. १ मेपासून व्यवसाय सावरण्याची अपेक्षा असतानाच लॉकडाऊन घोषित केल्याने सर्वच व्यापाऱ्यांचा कोट्यवधींचा व्यवसाय आणखी ठप्प होणार आहेत. झालेले आणि पुढे होणारे आर्थिक नुकसान कसे सोसायचे, असा सवाल लहान व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला.

राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या एक वर्षापासून आहे. गतवर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांना तसेच लहान-मोठे व्यापारी, शेतकरी यांना फार मोठे आर्थिक, मानसिक नुकसान सोसावे लागले आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही लॉकडाऊनमुळे सण आणि उत्सवातील व्यवसाय बुडाले आहे. उत्पन्न काहीही नसताना खर्चांचा बोझा वाढतच असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गेल्यावर्षी लॉकडाऊननंतर दसरा दिवाळीत कशीबशी दुकाने आणि शोरूम सुरू झाली. पण दिवाळीनंतर व्यवसाय पुन्हा ठप्प झाला. यावर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस कोरोनाची चाहूल लागल्यानंतर व्यवसाय पूर्णत: मंदीत गेला. आता तर लग्नसमारंभ केवळ २५ जणांच्या उपस्थितीत होत असल्याने त्यावर अवलंबून असणारे मंडप-डेकोरेशन, कॅटरिंग, कापड व्यापारी, भांड व सराफा, बॅण्डबाजा आणि अन्य व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. याशिवाय हेअर सलून, टपरीधारक, चहा कँटिन, पानटपरी, खेळणी दुकान, हॉटेल-रेस्टॉरंट, सलून, ब्युटी पार्लर आदी व्यावसायिकांवर आर्थिक नुकसानीमुळे संकट आले आहे. सर्व व्यावसायिक व्यापाऱ्यांचा या लॉकडाऊनला विरोध आहे.

सध्या सर्वच दुकानांचे अर्थकारण बिघडले असताना व्यावसायिकांनी घेतलेले कर्ज व त्यांचे हप्ते थकीत असताना मार्चमध्ये लाईट बिल, मनपा कर यासाठी तगादा लावल्यामुळे हे बिल लवकर भरण्यासाठी नवीन कर्ज काढावे लागणार आहे. कर्जाच्या डोंगराबरोबरच दुकानातील कर्मचाऱ्यांचे पगार, दुकानाचा खर्च, घरप्रपंच, दैनंदिन रोजीरोटीचा मासिक खर्चसुद्धा भागविणे अशक्य होत आहे. हा खर्च भागवण्यासाठीसुद्धा कर्जच काढावे लागणार आहे. त्यामुळे सर्व व्यापारी तिहेरी कर्जात अडकले असताना हा नवीन लॉकडाऊन व्यापाऱ्यांसाठी अस्मानी संकट ठरणार आहे.

 

नुकसान भरपाई कशी होणार

किराणा दुकाने सकाळी ११ पर्यंत सुरू असल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. याशिवाय किराणा वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ठोकमध्येच अनेक वस्तूंचे दर वाढले आहेत. लॉकडाऊनमुळे नुकसान भरपाई कशी होणार, हा गंभीर प्रश्न आहे.

प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा संघ.

 

सराफांना कोट्यवधींचे नुकसान

गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही सण व उत्सवातील व्यवसाय बुडाला आहे. बँकांचे कर्ज, कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्चाचा भार सहन करावा लागत आहे. व्यवसायाअभावी सराफांना कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. दुकाने सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

राजेश रोकडे, सचिव, सोना-चांदी ओळ कमिटी.

 

कापडाचा व्यवसाय ठप्प

लॉकडाऊनमुळे कापड व्यावसायिकांना लग्नसराईच्या सिझनला मुकावे लागले. त्यामुळे विक्रीसाठी मागविलेला माल पडून आहे. ठोक आणि वितरकांना कापडाची रक्कम द्यावी लागत आहे. बँकांचे वाढते कर्ज व हप्त्यांमुळे संकट वाढले आहे.

अजय मदान, माजी अध्यक्ष, गांधीबाग कापड व्यापारी असोसिएशन.

 

वस्तूंची विक्री कशी करणार

लॉकडाऊनमुळे दुकानदारांकडे किराणा वस्तूंची साठा पडून आहे. दुकाने सकाळी ११ पर्यंत सुरू राहत असल्याने विक्री कशी करायची, हा प्रश्न आहे. बाहेरून माल येणे बंद असल्याने अनेक वस्तूंचा तुटवडा जाणवत असून आर्थिक नुकसान वाढले आहे.

शिवप्रताप सिंह, वरिष्ठ उपाध्यक्ष, इतवारी किराणा व्यापारी असोसिएशन.

 

संकटातील व्यापाऱ्यांना मदत करा

वारंवार होणाऱ्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यापारी संकटात आले आहेत. पुढे दुकाने सुरू झाल्यानंतरही सुरळीत होण्यास वेळ लागेल. अनेक महिन्यांपर्यंत आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. त्यामुळे संकटात असलेल्या व्यापाऱ्यांना राज्य शासनाने पॅकेजरूपी मदत करावी.

अश्विन मेहाडिया, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.

Web Title: Lockdown again, how to bear the financial loss? Billions of rupees lost to traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.