लॉकडाऊन व पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीने व्यापारी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:06 AM2021-06-05T04:06:41+5:302021-06-05T04:06:41+5:30
नागपूर : लॉकडाऊन आणि पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक व्यापारी मानसिक आजाराने त्रस्त आहेत. गेल्या वर्षी आणि यंदा ...
नागपूर : लॉकडाऊन आणि पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक व्यापारी मानसिक आजाराने त्रस्त आहेत. गेल्या वर्षी आणि यंदा दुकाने बंद असल्याने अनेक जण बँकांच्या कर्जाच्या बोझ्याखाली दबले आहेत. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि घरखर्च चालविणे कठीण झाले आहे. त्यातच जीवनावश्यक आणि अन्य वस्तूंच्या किमती वाढल्याने व्यापारी संकटात आले आहेत. सरकारने इंधन जीएसटीच्या टप्प्यात आणावे आणि दुकाने नियमित सुरू करण्याची मागणी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने केली आहे. इंधन दरवाढीविरोधात चेंबरने निदर्शने केली आणि विरोध दर्शविला.
पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतीचा विरोध करताना चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, लहान व्यापारी वर्षभरापासून आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असल्याने व्यापाऱ्यांना कुटुंबाचा खर्च चालविणे कठीण झाले आहे. तसेच सामान्य जनताही त्रस्त असून त्यांचे महिन्याचे बजेट वाढले आहे. डिझेलची किंमत वाढल्याने मालवाहतूक वाढली आहे. त्यामुळे महागाईत भर पडली आहे. मेहाडिया म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कराचा बोझा कमी करून सामान्यांना दिलासा द्यावा. त्यामुळे व्यापारी आणि सामान्यांना आर्थिक अडचणींपासून आंशिक दिलासा मिळेल.
चेंबरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात निदर्शने करताना उपाध्यक्ष संजय के. अग्रवाल, सचिव रामअवतार तोतला, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव स्वप्निल अहिरकर उपस्थित होते.