लॉकडाऊन बर्थडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 09:11 AM2020-06-01T09:11:56+5:302020-06-01T09:12:17+5:30
वाढदिवस म्हणजे नेमके काय? वाढदिवस साजरा करणे म्हणजे पुढच्या वर्षात पदार्पण करताना मागच्या एक वर्षाच्या काळात ईश्वराने दिलेल्या साधनेच्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढे अशीच कृपादृष्टी ठेवण्याबद्दल ईश्वराचे आभार मानणे.
डॉ. शीतल जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: लॉकडाऊन सुरु असल्याने यावर्षी बहुतेक सर्वांचेच वाढदिवस, अॅनिवर्सरीज हे घरीच साजरे झालेत. त्यामुळे कोणताही बडेजाव न करता साधेपणाने घरातल्या घरातच ते साजरे करावे लागले. एकीकडे घरात राहून कंटाळलेले आपण बाहेर जाण्याच्या या संधीला पण मुकलो. पण खरंच या गोष्टीकडे आपण सकारात्मकतेने पाहिले तर! कारण आजकाल आपण कोणताही प्रसंग असो तो वाढदिवस असो की अॅनिवर्सरी आॅफीसमध्ये मिळणारं प्रमोशन असो की आजकाल आपण साजरे करणारे अनेक डेज. कुठलंही सेलिब्रेशन म्हटलं की आपण वाट धरतो ती हॉटेल्सची. हल्लीच्या पिढीला तर घरात कोणत्या गोष्टीचं सेलिब्रेशन करणं म्हणजे न पटणारं आहे. त्यातल्या त्यात बरेचजण नोकरी करणारे असल्यामुळे घरी काही करत बसायला कोणाजवळ वेळ नाही. पण यंदा कोरोनाने सर्वांना वेळच वेळ दिला आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये आलेले सर्वांचे वाढदिवस खास ठरले आहेत. त्यातली मीही एक आहे. वाढदिवस म्हणजे नेमके काय? वाढदिवस साजरा करणे म्हणजे पुढच्या वर्षात पदार्पण करताना मागच्या एक वर्षाच्या काळात ईश्वराने दिलेल्या साधनेच्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढे अशीच कृपादृष्टी ठेवण्याबद्दल ईश्वराचे आभार मानणे. वाढ आणि दिवस म्हणजे आपल्या आयुष्यात झालेली आणखी एक वर्षाची वाढ. खरं म्हणजे आपल्या आयुष्यातले एक वर्ष कमी होते. पण यावेळेस मात्र ही नकारात्मकता आपण येऊ देत नाही. आपल्याला या दिवशी भरभरून शुभेच्छा मिळाव्यात, आशीर्वाद मिळावे, आपलं कौतुक व्हावं ही आपली अपेक्षा असते आणि हे साहजिक आहे. आता तर सोशल मिडीयामुळे दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव चालू असतो. दिवसभर आपण स्पेशल असल्याची जाणीवही होत राहते. आपण हा आनंद अनुभवत राहतो, त्यामुळे त्याचे आभारच मानायला हवेत! नाही का! आनंद कोणाला नको असतो. प्रत्येक जण तो मिळवण्यासाठी धडपडत असतो. भलेही तो मिळवण्याचा प्रकार प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. आपल्या वाढदिवशी आपल्या घरची माणसं आपल्यासाठी काही खास करतात. आपली मुलं किचनमध्ये धडपडतात. नवरा काही खास करून खाऊ घालतो. भेटीगाठी होऊ शकत नसल्यामुळे आप्तेष्टांसाठी विविध व्हिडीओज बनवून, कविता लिहून आपले प्रेम व्यक्त करत आहेत. हा अनुभव किती आनंददायी आणि अवर्णनीय आहे. पैसे खर्च करून हा आपण मिळवू शकत नाही. त्या व्यक्तीबद्दल असणारे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असणे हे यामागचे कारण असते. मागील काही वर्षात काही अंशी या आनंदाला आपण सर्वच मुकलो होतो. याचे कारण म्हणजे काही खास असलं की आपण ते साजरा करायला बाहेर काढता पाय घ्यायचो. पण पैशाने भावना विकत घेता येत नाही ना ! कोरोना आला आणि बरंच काही शिकवून गेला. आपण घरात बंदिस्त झालो. सुरुवातीला फार अवघडले गेलो. घरात सर्वांनी इतका वेळ एकत्र राहायची आपल्याला सवयच नाही. लॉकडाऊन वाढत गेला आणि आलेल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला आपण हळूहळू शिकलो. या कालावधीत बरेच जण पॅनिक झाले, अस्वस्थ झाले. पण जमेची बाजूही की घरात इतके दिवस एकत्र राहून आपण एकमेकांशी जुळवून घ्यायला शिकलो. अवाढव्य खर्च न करताही आपण महिना काढू शकतो हेही शिकलो. कोरोना संकटाने शिकवलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दया, करुणा बाळगा व इतरांविषयी आदर ठेवा. प्रत्येकाला सम्मानाने वागवा. तो आपल्यापेक्षा वयाने लहान असो की मोठा वा गरीब असो की श्रीमंत. या गोष्टी मला शिकवण्याची काहीच गरज नाही. आपण सर्व सुज्ञ आहात. पण जीवनाच्या शर्यतीत आपण ज्या वेगाने पळत सुटलो होतो त्यात याचे विस्मरण झाले होते हे नक्की ! या सर्व गोष्टींची आठवण कोरोनाने आपल्याला पुन्हा एकदा करून दिली आहे. जीवन आणि पैसा यातला फरक सर्वांना कळला. पैसे कमावण्याच्या शर्यतीत आपण असे पळत सुटलो आहोत की पैशाशिवाय आनंदच नाही. मुळी ही आपली धारणा होऊन बसली आहे. त्यामुळे झालं काय तर जवळ असलेल्या आनंदाला मुकतो आहोत आणि दिवस काय आलेत. जीवनाची शाश्वतीच उरली नाही. सारं आयुष्य पैशासाठी खर्ची घातलं. आता तो खर्च करायला बाहेर पडू शकत नाही. कोरोनाने साऱ्या जगाला हतबल करून सोडलं आहे. तंत्रज्ञान विकास, सर्वशक्तीमान बनण्याच्या हव्यासात हे विषाणूंचं देणं आपल्या पदरी पडलं आहे. पुन्हा कोणता विषाणू दाराशी येऊन उभा राहील हे सांगता येत नाही आणि जर या संकटात आपली प्रिय व्यक्ती सापडली तर तिचे अंत्यदर्शनही दुर्लभ होऊन बसतं. म्हणून आपल्या आप्तस्वकीयांसोबत वेळ घालवा, त्यांना समजून घ्या, येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगा, निसर्गावर भरभरून प्रेम करा, जीवनाचा आनंद लुटा, तो शोधा म्हणजे सापडेलच!