नागपुरातील कुत्र्यांच्या नसबंदीला लॉकडाऊनचा ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 01:15 PM2020-06-03T13:15:02+5:302020-06-03T13:16:47+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या कामाला मर्यादा आल्या आहेत. या टाळेबंदीमुळे नागपुरात भटक्या श्वानांच्या नसबंदीचे काम मंदावले आहे.
रियाज अहमद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या कामाला मर्यादा आल्या आहेत. या टाळेबंदीमुळे नागपुरात भटक्या श्वानांच्या नसबंदीचे काम मंदावले आहे. मागील कार्यकाळाच्या तुलनेत यावेळी नसबंदीच्या प्रमाणात कमतरता आल्याचे दिसून येत आहे. अशात वातावरणात बदल झाल्याचेही चित्र आहे. त्यात कमी नसबंदीमुळे भटक्या श्वानांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे झालेल्या नोंदीनुसार शहरात भटक्या श्वानांची संख्या ८० हजाराच्या जवळपास आहे.
महापालिकेचे पशु आरोग्य अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले सांगितले, शहरातील ५ संस्थांना भटक्या श्वानांच्या नसबंदीचे काम देण्यात येणार होते. मात्र टाळेबंदीमुळे ते शक्य झाले नाही व केवळ एकाच संस्थेला हे कंत्राट देण्यात आले. इतर चार संस्थांचे वर्क ऑर्डर झाले आहेत पण टाळेबंदीनंतरच या संस्थांचे काम सुरू होऊ शकेल. सध्या एकच संस्था काम करीत असल्याने आतापर्यंत केवळ ६ हजार श्वानांची नसबंदी करणे शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नसबंदीचे काम केवळ गोरेवाडा केंद्रात सुरू आहे.
श्वान होत आहेत आक्रमक, नागरिकांमध्ये दहशत
अवेळी झालेल्या पावसाने हवामानात बदल झाला असून रस्त्यावर श्वानांच्या झुंडी जमा होत आहेत. ते आक्रमक झाले असून येणाऱ्या जाणाºयावर हल्ला करायला धावतात. यामुळे लोकांमध्ये भटक्या श्वानांची दहशत निर्माण झाली आहे. नमूद करण्याची बाब म्हणजे पावसाच्या दिवसात श्वान आक्रमक होण्याची स्थिती दिसून येते आणि वाहन चालकांना हा त्रास सहन करावा लागतो. रामदासपेठ, असीनगर, मानेवाडा रोड, कामठी रोड, उमरेड रोड, रामेश्वरी रोड, सीए रोड, सदर, मानकापुर रोड, गिट्टीखदान रोड आदी ठिकाणी श्वानांच्या झुंडी दिसून येत असून या मार्गावर जाणारे वाटसरू, वाहनचालक याना प्रचंड दहशत सहन करावी लागत आहे. झुंडीने हल्ला करून चावा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन घरी जावे लागते.