लॉकडाऊनमुळे तापमानात २ अंशाचा फरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 10:23 AM2020-05-06T10:23:22+5:302020-05-06T10:23:52+5:30
रस्त्यावरून आधीसारखी वाहने धावत नाहीत. कारखानेही बंद आहेत. यामुळे वातावरणामध्ये कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाणही घटले आहे. हे सर्व सुरू असते तर सध्याच्या तापमानात २ अंश सेल्सिअसची वाढ दिसली असती, असे जाणकारांचे मत आहे.
वसीम कुरैशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ४० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. रस्त्यावरून आधीसारखी वाहने धावत नाहीत. कारखानेही बंद आहेत. यामुळे वातावरणामध्ये कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाणही घटले आहे. यामुळे सध्याच्या तापमानात वाहन आणि कारखान्यांच्या उष्णतेचा समावेश नाही. हे सर्व सुरू असते तर सध्याच्या तापमानात २ अंश सेल्सिअसची वाढ दिसली असती, असे जाणकारांचे मत आहे.
पर्यावरणाशी संबंधित अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या उष्णतामानामध्ये कसलीही सरमिसळ नाही. स्वच्छ नैसर्गिक वातावरणातील खऱ्या तापमानाचा अनुभव घेण्याचे हे दिवस आहेत. निसर्गाला जणूकाही आराम करण्याची संधीच मिळाली आहे. यामुळे निसर्गाच्या क्षमतेमध्ये विकास होत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान(नीरी)चे मुख्य वैज्ञानिक डॉ. जयशंकर पांडेय म्हणाले, माणसाला आपल्या आजारपणाविरुद्ध लढण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जेवढी पोषक आहाराची गरज असते, तेवढीच विश्रांतीचीही असते. वीकेंडची संकल्पनाही यातूनच उदयास आली आहे. औद्योगिकीकरणातसुद्धा असा ‘पॉज’ निश्चित करायला हवा. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण राखण्यासाठी सरकारने कुटुंब कल्याण योजना अस्तित्वात आणली. त्याचप्रमाणे औद्योगिक नियोजनही आखायला हवे. निसर्गाने कुठे हिरवळ तर कुठे खडकाळ जमीन दिली आहे. हे असे का, याची माणसाला कल्पना नाही. परिणामत: पृथ्वी आणि निसर्गाची स्थिती समजून न घेता माणसाने मनास येईल तिथे शहरीकरण आणि वाट्टेल तिथे कारखाने उभारले आहेत. त्यामुळेच तापमानामध्ये विसंगती दिसत आहे.
प्रत्येक मजूर, कामगार कमाईसाठी दिल्ली, मुंबईसारखी शहरे गाठतो. यामुळे पलायनाची समस्या निर्माण होते. महात्मा गांधींनी ग्राम व्यवस्थापन आणि स्थानिक स्वयं सरकारची संकल्पना मांडली होती. प्रत्येक जिल्हे दिल्ली, मुंबई होऊ शकणार नाहीत, मात्र सक्षम नक्कीच बनतील. या सोशियो इकॉनॉमिक मॉडेलचा पर्यावरण संतुलनाशी थेट संपर्क आहे. देशातील औद्यागिकीकरण वाढविण्यासाठी कृषी व त्याच्याशी संबंधित उत्पादन वाढीवर अधिक भर असावा, असे आपले मत आहे.
-डॉ. जयशंकर पाण्डेय, मुख्य वैज्ञानिक, नीरी
वातावरणातील तापमानातील चढ-उतारामागे आर्द्रता, ढगांची निर्मिती प्रक्रिया हे मुख्य कारण असते. मात्र, वाहतूक आणि औद्योगीकरण सुरू असलेल्या दिवसात, उन्हाळ्यामध्ये सरासरी २ अंशाने तापमान वाढू शकते. या वर्षी एप्रिल महिन्यातील कमाल तापमान मागील पाच वर्षात प्रथमच ४०.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
-एम.एल. साहू, डीडीजीएम, नागपूर हवामान केंद्र