मिरची कटाई केंद्रांना लॉकडाऊनचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:13+5:302021-06-01T04:08:13+5:30
शरद मिरे भिवापूर : शंभर, दोनशे नव्हे, तर तब्बल चार हजारांवर मजुरांच्या हाताला काम देणारे मिरची कटाई केंद्र लॉकडाऊनमुळे ...
शरद मिरे
भिवापूर : शंभर, दोनशे नव्हे, तर तब्बल चार हजारांवर मजुरांच्या हाताला काम देणारे मिरची कटाई केंद्र लॉकडाऊनमुळे गत दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे एरवी मजुरांच्या उपस्थितीने गजबजणारा हा श्रमाचा परिसर आता ओसाड पडलेला आहे. येथे काम करणारे मजूरही कामाअभावी आर्थिक कोंडीत सापडले आहे. लॉकडाऊनचे ‘लॉक’ एकदाचे उघडेल आणि कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न सुटेल याकडे असंख्य मजुरांचे लक्ष लागले आहे. तालुक्यात रोजगाराचे कुठलेही साधन नाही. अशात मिरची कटाई केंद्राच्या माध्यमातूनच चार हजारांवर गोर, गरीब, गरजू, निराधार मजुरांच्या हाताला काम मिळते. मिळणाऱ्या मजुरीतूनच कुटुंबाचे पालनपोषन, आरोग्य व मुलांचे शिक्षण, आदी समस्यांवर हे मजूर मात करतात. शहर व आजूबाजूच्या परिसरात जवळपास दहावर मिरची कटाई केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर पाचशे ते हजार मजूर काम करतात. अशा प्रकारे मिरची कटाईच्या माध्यमातून शहरातील अंदाजे चार हजारांवर मजुरांच्या हाताला काम मिळते. गतवर्षी लॉकडाऊनमुळे जवळपास पाच महिने हे मिरची कटाई केंद्र बंद होते. यावर्षी पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. कटाई केंद्र पुन्हा बंद झाले आहे. अशात हाताला काम आणि खिशात दाम नसताना जगायचे कसे असा प्रश्न मजुरांसमोर पडला आहे.
मदतीचा हात आखूड झाला
गतवर्षी लॉकडाऊनमध्ये मिरची कटाई केंद्र पाच महिने बंद होते. या काळात जीवन जगण्यासाठी मजुरांची धडपड सुरू होती. दरम्यान, विविध पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी मजुरांना मदतीचा हात दिला. अन्नधान्य व किराणा किट त्यांनी वितरित केल्यात. या कठीण काळावर मात केल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली. मजुरांनी नव्या हिंमतीने काम सुरू केले. अशातच पुन्हा दुसरी लाट आली आणि परिस्थिती ‘जैसे थे’ झाली. माञ, यावेळी मदतीचे हात आखूड झाले आहे. गतवर्षी अन्नधान्याचे किट वाटणारे नेतेही यावर्षी गायब झाले आहे. या पडत्या काळात मजुरांना ना शासनाची मदत मिळाली, ना लोकप्रतिनिधींकडून मदतीचा हात मिळाला.
मिरची कटाई केंद्र सुरू करा
गत दोन महिन्यांपासून मिरची कटाई केंद्र बंद असल्यामुळे चार हजारांवर मजुरांसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने हे रोजगाराचे केंद्र असलेले मिरची कटाई केंद्र तत्काळ सुरू करावे. यादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझर, आदींचे आम्ही काटेकोर पालन करू किंवा किमान पन्नास टक्के मजुरांना तरी येथे काम करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मजुरांनी केली आहे.
--
मिरची कटाई केंद्रावर काम करून आम्ही आपले पोट भरतो. माञ, लॉकडाऊनमुळे गत दोन महिन्यांपासून मिरची कटाई केंद्र बंद आहे. अशात आम्ही जगायचे कसे, या पडतीच्या काळात आम्हा मजुरांना शासनाकडून काहीएक आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे शासनाने आमचे रोजगार केंद्र तत्काळ सुरू करावे.
- आम्रपाली मेश्राम, मिरची कटाई कामगार