लॉकडाऊनमध्ये चिमुकलीची जमली काेकिळेशी गट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:07 AM2021-06-03T04:07:13+5:302021-06-03T04:07:13+5:30

चिमुकल्या अनन्याचे कोकिळेशी झाली घनिष्ठ मैत्री : तिच्या आवाजाला दररोज देते प्रतिसाद नागपूर : लॉकडाऊनमध्ये मुले सतत घरात कोंडून ...

In the lockdown, Chimukli's group got together | लॉकडाऊनमध्ये चिमुकलीची जमली काेकिळेशी गट्टी

लॉकडाऊनमध्ये चिमुकलीची जमली काेकिळेशी गट्टी

Next

चिमुकल्या अनन्याचे कोकिळेशी झाली घनिष्ठ मैत्री : तिच्या आवाजाला दररोज देते प्रतिसाद

नागपूर : लॉकडाऊनमध्ये मुले सतत घरात कोंडून आहेत. उन्हाळी सुट्या असल्याने त्यांच्या ऑनलाइन क्लासेसलाही ब्रेक लागला आहे. त्यामुळे चिमुकल्यांचे आयुष्य घरातल्या चार खोल्या, छोटेसे अंगण अथवा १० बाय १० च्या बाल्कनी एवढ्यापुरतेच मर्यादित झाले आहे. मात्र, या मर्यादित आयुष्यातही लहान मुले आनंद शोधून घेत आहेत. वाडी परिसरात राहणाऱ्या दहावर्षीय अनन्या हिने या लॉकडाऊनच्या काळात एका कोकिळेशी मैत्री केली आहे. दररोज त्या दोघी बाल्कनीत भेटतात. आवाज काढून एकमेकींना प्रतिसाद देतात.

दहा वर्षांची अनन्या वशिष्ठ गेल्या अनेक महिन्यांपासून घरात फक्त मजा म्हणून कोकिळेचा आवाज काढायची. सुरुवातीला मुले जसे वेगवेगळ्या पशू-पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करतात, तसेच तिचे प्रयत्न असायचे. मात्र, सरावाने अनन्याने कोकिळेचा जवळपास हुबेहुब आवाज काढण्याचे कौशल्य हस्तगत केले. कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा बाल्कनीमध्ये उभी राहून कोकिळेचा आवाज काढणाऱ्या अनन्याला जवळच्या जांभळाच्या झाडावरून कोकिळेचा प्रतिसाद मिळू लागला. एक स्वर अनन्याचा, तर एक स्वर कोकिळेचा, अशी जुगलबंदीच चालू झाली. एकदा, दोनदा असेच घडले आणि आता तर ती कोकिळा दर दोन दिवसांतून एकदा अनन्याच्या घराजवळील त्या जांभळ्याच्या झाडावर येऊन बसते आणि मंजूळ आवाजात गाते. तेवढ्यात अनन्याने प्रतिसाद दिल्यास पुन्हा काही वेळ जुगलबंदी सुरू असते. गेल्या एक- दीड महिन्यापासून हा क्रम दर दोन दिवसांतून एकदा घडत आहे.

अनन्याने काही दिवसांपूर्वी तिच्या ऑनलाइन कोडिंग क्लासमध्ये टीचरच्या सांगण्यावरून एक प्रोजेक्ट तयार केला होता. त्यामध्ये विविध प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज त्यांच्या चित्र व माहितीसह ऑडिओ फाइलचा स्वरूपात लावायचे होते. अनन्याने तो प्रोजेक्ट करताना सर्व प्राणी आणि पक्ष्यांचे आवाज गुगलवरून ऑडिओ फाइलच्या स्वरूपात घेतले. मात्र, कोकिळेचा आवाज तिने स्वत:चा लावला. कोकिळेच्या बाबतीत माझा आवाज मिळताजुळता आहे, असा तिचा तर्क होता; पण काही दिवसांनी अनन्याची खऱ्या कोकिळेसोबत रंगणारी जुगलबंदी पाहून घरचेही आश्चर्यचकित झाले.

लॉकडाऊनच्या काळात अनन्याला एक सुरेल मैत्रीण मिळाली आहे. दोघींचीही जुगलबंदी परिसरात अनेकांसाठी आश्चर्याची ठरतेय.

Web Title: In the lockdown, Chimukli's group got together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.