नागपूर जिल्ह्यात पक्ष्यांच्या तलावांवरील अधिवासावर ‘लॉकडाऊन इफेक्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:00 PM2020-06-26T23:00:00+5:302020-06-26T23:00:02+5:30
तीन महिन्यांच्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील पाणस्थळ भागात पक्ष्यांच्या अधिवासावर काय परिणाम झाले, स्थानिक पक्षी, स्थलांतरित पक्षी, त्यांचे प्रजनन, या भागातील अन्नसाखळी आदी गोष्टींचा डेटाबेस अभ्यास करण्यासाठी सध्या पक्षिनिरीक्षक कामाला लागले आहेत.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन महिन्यांच्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील पाणस्थळ भागात पक्ष्यांच्या अधिवासावर काय परिणाम झाले, स्थानिक पक्षी, स्थलांतरित पक्षी, त्यांचे प्रजनन, या भागातील अन्नसाखळी आदी गोष्टींचा डेटाबेस अभ्यास करण्यासाठी सध्या पक्षिनिरीक्षक कामाला लागले आहेत. नागपूर वनविभागाच्या पुढाकाराने हा अभ्यास कार्यक्रम राबविला जात असून अशाप्रकारचा राज्यातील हा पहिलाच उपक्रम ठरला आहे.
कोविड महामारीच्या नियंत्रणासाठी लावलेल्या लॉकडाऊनचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक सकारात्मक परिणाम झाले. मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने विशेषत: पक्षी आणि प्राण्यांनी त्यांच्या अधिवासात मोकळा श्वास घेतला. टाळेबंदीमुळे जिल्ह्यातील पाणथळ भागात पक्ष्यांच्या हालचालीत कशाप्रकारे परिणाम झाले याचा गुणात्मक अभ्यास करण्याच कार्यक्रम नागपूर वनविभागाने सुरू केला आहे. पक्षी अभ्यासक अविनाश लोंढे यांच्या नेतृत्वात ‘बर्डस ऑफ विदर्भ’च्या मदतीने हा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील १०० च्यावर तलावांवर अभ्यास केला जात आहे. अविनाश लोंढे यांनी सांगितले, २०१३ पासून तलावांवर पक्ष्यांच्या प्रजननात विपरीत परिणाम दिसून येत होते. मानवी हस्तक्षेप वाढल्याने प्रवासी पक्षी येईनासे आणि स्थानिक पक्षी दिसेनासे झाले होते. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे पहिल्यांदा अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. पक्ष्यांचा किलबिलाट वाढला, स्थानिक पक्ष्यांसह स्थलांतरित पक्ष्यांचा वावर वाढला. याच बदलाचा डेटा तयार करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
हा अभ्यास किमान वर्षभर चालणार आहे. लॉकडाऊन ते पावसाळा असा पहिला टप्पा असेल तर हिवाळा ते उन्हाळ्याची सुरुवात असा दुसऱ्या टप्प्याचा अभ्यास होईल. लॉकडाऊननंतरची सद्यस्थिती, पावसाळा आणि हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांच्या हालचाली, स्थानिक आणि प्रवासी पक्ष्यांमध्ये संख्यात्मक बदल (वाढ किंवा घट), त्यांची प्रजनन क्षमता, अधिवासातील उपलब्ध अन्नसाखळी, हस्तक्षेप नसल्याने कोणत्या प्रजाती वाढल्या अशा सर्व बाबींवर गुणात्मक अभ्यास केला जाणार असल्याचे अविनाश लोंढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
मानवी वावर कमी असला की प्रदूषण व पर्यावरणावर त्याचे सकारात्मक परिणाम निश्चित होतात. टाळेबंदीमुळे असे बदल जाणवले आहेत. पाणस्थळ भागात पक्ष्यांवर टाळेबंदी व त्यानंतर काय परिणाम झाले, कोणते पक्षी वाढले, घटले याचा अभ्यासपूर्ण डेटा तयार करण्यात येत आहे. पुढे पक्षी संवर्धनासाठी धोरण तयार करताना या अभ्यास अहवालाचा लाभ निश्चित होईल.
- प्रभुनाथ शुक्ल, उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग
२०१३ नंतर पक्ष्यांच्या हालचाली कमी झाल्याने चिंता निर्माण झाली होती. टाळेबंदीने ही कमतरता भरून काढली. या काळात स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांची संख्या आणि त्यांची प्रजनन क्षमता वाढल्याचे दिसून आले. आता उन्हाळ्यापर्यंत पूर्ण सीझनमध्ये या हालचालीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. भविष्यात यामुळे एक दिशा निश्चित करण्यास मोठी मदत होईल.
अविनाश लोंढे, पक्षी अभ्यासक