कॅम्पस सिलेक्शनवर लॉकडाऊनचा परिणाम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 02:10 PM2020-04-26T14:10:25+5:302020-04-26T14:11:37+5:30
लॉकडाऊनच्या काळातही घरात बसलेल्या विद्यार्थ्यांना एक आशादायक बातमी आहे, कॅम्पस सिलेक्शनच्या माध्यमातून त्यांना मिळालेल्या नोकऱ्या सुरक्षित आहेत.
आशिष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनच्या काळातही घरात बसलेल्या विद्यार्थ्यांना एक आशादायक बातमी आहे, कॅम्पस सिलेक्शनच्या माध्यमातून त्यांना मिळालेल्या नोकऱ्या सुरक्षित आहेत. अद्यापतरी कुण्या कंपनीने कॉलेज किंवा संस्थांच्या माध्यमातून दिलेल्या नोकरीची आॅफर परत घेतलेली नाही, उलट आॅनलाईन मुलाखती घेऊन निवड सुरू आहे.
साधारणत: कंपन्या नोव्हेंबरपासून संस्था व महाविद्यालयांमध्ये जाऊन कॅम्पस इंटरव्ह्यू घेतात. प्राप्त माहितीनुसार, नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या काळात १६३ कंपन्यांनी नागपूरसह परिसरातील कॅम्पसमध्ये मुलाखती घेतल्या होत्या. बहुतेक कंपन्या भारतीय आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने नोकºया मिळाल्या आहेत. इंजिनियरिंगच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व आॅटोमोबाइल अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक रोजगार आणि पॅकेज मिळते. याशिवाय हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठीही संधी आहे. मात्र आॅफर लेटर मिळण्यापूर्वीच लॉकडाऊन सुरू झाले. अनेकांच्या मुलाखती राहून गेल्या. त्यामुळे चिंतेचे सावट होते. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांमध्ये रोजगार कपात सुरु असून नवे रोजगार जाण्याचीही भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे चिंता वाढली असली तरी ही आशादायक बातमी आहे.
ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंटशी संबंधित डॉ. मुजाहिद सिद्दीकी यांच्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे उत्पादन ठप्प आहे. मात्र ते हटताच काम पुन्हा सुरू होईल. भविष्यात भारतीय उत्पादनांची मागणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाढत्या मागाणीसोबत उत्पादनातही वेग आणावा लागेल. अशा वेळी कंपन्यांना उत्तम व प्रशिक्षित मनुष्यबळ लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही कंपन्या प्रतिभाशाली युवकांचे मनुष्यबळ गमावू इच्छित नाही.
परीक्षेचा होऊ शकतो अडथळा
लॉकडाऊनमुळे विद्यापीठाच्या परीक्षा खोळंबल्या आहेत. लॉकडाऊन हटताच आधी परीक्षा द्याव्या लागतील. परीक्षा होऊन निकाल लागत नाही तोवर कंपन्या सेवेत समाविष्ट करू शकत नाहीत. त्यामुळे लांबलेली परीक्षा विद्यार्थ्यांसाठी चिंतेची बाब ठरू शकते. देशभारतील विद्यापीठांमध्ये परीक्षांसंदर्भात समान स्थिती आहे. लॉकडाऊन संपताच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळावी यासाठी नागपूर व अमरावतीमध्ये खाजगी विद्यापीठे आणि स्वायत्त संस्था विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन परीक्षा घेत आहेत.