लॉकडाऊनचा महावितरणला फटका : ३१६ वरून १२९ कोटीवर घसरला वीज बिल भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 07:30 PM2020-05-05T19:30:36+5:302020-05-05T19:36:50+5:30
बहुतांश ग्राहक वीज बिल भरण्यास उदासीन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लॉकडाऊनमुळे वीज मीटरचे रीडिंग घेणे व बिल वाटणे ...
बहुतांश ग्राहक वीज बिल भरण्यास उदासीन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे वीज मीटरचे रीडिंग घेणे व बिल वाटणे बंद आहे. त्याचा थेट परिणाम वसुलीवर पडला आहे. बहुतांश ग्राहक वीज बिल भरण्यास उदासीनता दाखवत आहेत. त्यामुळे वीज बिलाचा भरणा ३१६.५० कोटीवरून १२९.३५ कोटी रुपयावर घसरला आहे.
कोरोना संक्रमण होऊ नये याकरिता बिलिंग प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. बिल संकलन केंद्रेही बंद करण्यात आली आहेत. ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून सरासरी बिले पाठविली जात आहेत. योग्य बिलाची अपेक्षा असलेल्या ग्राहकांना मोबाईल अॅप किंवा वेबसाईटवर रीडिंग पाठविण्याचा पर्याय देण्यात आला आहे. नागपूर परिमंडळात २७ हजार ७२० नागरिकांनी या सुविधेचा उपयोग केला. परंतु, बहुतांश ग्राहक वीज बिलाची वाट पाहात आहेत. त्यामुळे महावितरणचे उत्पन्न वेगात घटले आहे. जानेवारी ते एप्रिलमधील आकडेवारी पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते. जानेवारीमध्ये ग्राहकांनी ३१६.५० कोटी रुपयाचे बिल भरले होते. त्यात औद्योगिक ग्राहकांचा वाटा १६१.५५ कोटी तर, घरगुती ग्राहकांचा वाटा १५४.९५ कोटी रुपये होता. एप्रिलमध्ये केवळ १२९.३५ कोटी रुपयाचे बिल जमा करण्यात आले. घरगुती ग्राहकांनी केवळ २९.९५ कोटी रुपयेच जमा केले तर, औद्योगिक ग्राहकांनी ९९.४ कोटी रुपये भरले. एप्रिलमध्ये उद्योग व वाणिज्यिक प्रतिष्ठाने बंद असल्यामुळे वीज वापर कमी झाला. परिणामी, बहुतांश औद्योगिक ग्राहकांनी बिल जमा केले.
असा घटला वीज बिल भरणा
महिने एलटी ग्राहक एचटी ग्राहक एकूण
जानेवारी १५४.९५ १६१.५५ ३१६.५०
फेब्रुवारी १४३.७९ १५८.६० ३०२.५०
मार्च ११५.७९ १६३.९६ २७९.५४
एप्रिल २९.९५ ९९.४ १२९.३५
नोट : रक्कम कोटीमध्ये
प्रोत्साहन अभियान सुरू
लॉकडाऊनमुळे वीज बिल भरणा कमी झाला आहे. सध्या रीडिंग घेणे व बिल वाटणे बंद आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर व्यवस्था पूर्वीसारखी होईल. बिल थकविणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जाईल. ग्राहकांनी मीटर रीडिंग ऑनलाईन पद्धतीने पाठवावे तसेच वीज बिल नियमित भरावे. त्यामुळे लॉकडाऊननंतर त्यांच्यावर आर्थिक ताण येणार नाही. ग्राहकांनी आॅनलाईन रीडिंग पाठवावे व बिल नियमित भरावे, याकरिता प्रोत्साहन अभियान राबविण्यात येत आहे.
-दिलीप दोडके, प्रभारी मुख्य अभियंता, महावितरण.