लॉकडाऊनमुळे रुग्णालय गाठणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:07 AM2021-03-16T04:07:51+5:302021-03-16T04:07:51+5:30

नागपूर : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी सोमवारपासून लॉकडाऊन लावण्यात आले. वैद्यकीय उपचारासाठी वाहतुकीला बंदी नसली तरी प्रवाशीच नसल्याने ...

The lockdown made it difficult to reach the hospital | लॉकडाऊनमुळे रुग्णालय गाठणे झाले कठीण

लॉकडाऊनमुळे रुग्णालय गाठणे झाले कठीण

Next

नागपूर : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी सोमवारपासून लॉकडाऊन लावण्यात आले. वैद्यकीय उपचारासाठी वाहतुकीला बंदी नसली तरी प्रवाशीच नसल्याने फार कमी ऑटोरिक्षा, कॅब रस्त्यावर होत्या. रुग्णालय गाठणे अनेकांना कठीण झाले. परिणामी मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) आज ३० ते ४० टक्के घट दिसून आली. इतर दिवशी तीन ते चार हजारावर जाणारी ओपीडी आज मेडिकलमध्ये १४६३ तर मेयोमध्ये ७९७ होती. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मात्र आज नेहमीनुसार ५२२ वर ओपीडी गेली.

नागपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारावर तर मागील १७ दिवसापासून हजारावर जात आहे. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी व संसर्गाची चेन तोडण्यासाठी प्रशासनाने आजपासून कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला. यातून वैद्यकीय सेवांना वगळण्यात आले. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून ५० टक्के क्षमतेने सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतुकीला मंजुरी होती. परंतु रस्त्यावर प्रवाशीच कमी असल्याने फार कमी ऑटोरिक्षा रस्त्यावर होत्या. मोजक्याच बसेस असल्याने रुग्णांची अडचण झाली. खासगी वाहनातून रुग्णालयात आल्यास पोलीस अडवतील या भीतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) ओपीडीत मोठी घट आली. साधारण ३० ते ४० टक्क्याने घट आल्याचे दिसून येत आहे.

- तीन हजारावर जाणारी ओपीडी आज हजाराखाली

मेयोचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे म्हणाले, इतर दिवशी अडीच ते तीन हजारावर जाणारी ओपीडी आज हजाराखाली आली. ७९७ रुग्ण उपचारासाठी आले. रुग्णांनी अंगावर आजार काढू नये किंवा स्वत:हून औषधी घेऊ नये. रुग्णालयात येऊन तपासून घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

- मेडिकलमध्ये दुपारी १२ वाजेनंतर शुकशुकाट

मेडिकलच्या ओपीडीमध्ये इतर दिवशी साधारण चार हजारावर रुग्ण येतात. परंतु लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी रुग्णसंख्येत ४० टक्क्याने घट आली. १४६३ रुग्ण उपचारासाठी आले. यामुळे १२ वाजेनंतर ओपीडीमध्ये शुकशुकाट होता. मेयो, मेडिकलमध्ये आज केवळ अतिमहत्त्वाच्या शस्त्रक्रिया झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

-‘सुपर’मध्ये हृदय रुग्णांची गर्दी

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज हृदय शल्यचिकित्सा विभाग व हृदयरोग विभागाची ओपीडी असते. आठवड्यातून दोनच दिवस या विभागाची ओपीडी राहत असल्याने दोन्ही विभाग मिळून ५२२ रुग्णांनी उपचार घेतले. इतर दिवसाच्या तुलनेत यात किंचित घट आली असली तरी गर्दी होती. दोन ‘अ‍ॅन्जीओग्राफी’ झाल्या. मंगळवारी तीन मोठ्या हृदय शस्त्रक्रिया असल्याची माहिती रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी दिली.

Web Title: The lockdown made it difficult to reach the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.