नागपुरातील लॉकडाऊनचा लसीकरणाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:10 AM2021-03-17T04:10:02+5:302021-03-17T04:10:02+5:30
नागपूर : सोमवार (दि. १५) पासून सुरू झालेल्या कडक लॉकडाऊनमध्ये लसीकरण केंद्र व प्रवासी वाहतुकीला वगळण्यात आले आहे. परंतु ...
नागपूर : सोमवार (दि. १५) पासून सुरू झालेल्या कडक लॉकडाऊनमध्ये लसीकरण केंद्र व प्रवासी वाहतुकीला वगळण्यात आले आहे. परंतु त्यानंतरही याचा फटका कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला बसताना दिसून येत आहे. विशेषत: ज्येष्ठांचे कमी लसीकरण होत आहे. मंगळवारी ९०६२ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. यात ज्येष्ठांची संख्या कमी होऊन ५,२६३ आली; तर, ४५ वर्षांवरील गंभीर आजाराच्या रुग्णांची संख्या १८८१ होती.
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होताच सर्वाधिक प्रतिसाद ६० वर्षांवरील ज्येष्ठांनी दिला. लॉकडाऊन लागण्यापूर्वी, १२ मार्च रोजी एकूण ८८३० लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. यात ६० वर्षांवरील ५३२४, गंभीर आजार असलेल्या १६१९ लाभार्थ्यांचा समावेश होता. १३ मार्च रोजी लसीकरण वाढून ११,२०७ झाले. यात ६० वर्षांवरील ७१७८, तर गंभीर आजारांचे २४६८ लाभार्थी होते. सोमवारी लॉकडाऊनचा काहीसा परिणाम झाला. १०,३९८ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. यात ५९११ ज्येष्ठ, तर गंभीर आजाराचे २१२६ लाभार्थी होते. मंगळवारी आणखी यात घट झाली. याविषयी काही ज्येष्ठांना विचारले असता त्यांनी रस्त्यावर उभे असलेल्या पोलिसांची भीती व वाहतुकीची कमी साधने ही समस्या सांगितली.