नागपुरात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन; कोरोनाच्या स्ट्रेनबाबत दिल्लीच्या अहवालाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 03:38 PM2021-03-20T15:38:19+5:302021-03-20T15:46:14+5:30
Nagpur News शहर व ग्रामीण भागातील लॉकडाऊनची मर्यादा आता वाढवून ३१ मार्चपर्यंत करण्यात आली असल्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना येथे शनिवारी दुपारी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शहर व ग्रामीण भागातील लॉकडाऊनची मर्यादा आता वाढवून ३१ मार्चपर्यंत करण्यात आली असल्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना येथे शनिवारी दुपारी केली.
शहरात व ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर पसरत असण्याच्या काळात हा संसर्ग कमी करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते, व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नितीन राऊत यांनी, शहरात व ग्रामीण भागात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र या काळात अर्थचक्र रोखले जाणार नाही याची काळजी घेऊ असेही सांगितले.
फळे, भाजीपाला, धान्य दुकाने 4 वाजता पर्यंत सुरू राहतील, ऑनलाईन रेस्टरंट 7 वाजता पर्यंत सुरू राहतील असेही सांगितले.
शहरातील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची चाचणी करण्यासाठी त्याचे नमुने दिल्लीत पाठवले आहेत. मात्र त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली आहे, त्यांनी दिल्लीतून आम्हाला हा अहवाल लवकरात लवकर मिळवून द्यावा. त्यांनी तसे आश्वासन दिले असल्याचे राऊत पुढे म्हणाले.
नागपुरात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा दोन हजारावरून साडेतीन हजारावर गेला आहे. ही चिंतेची बाब आहे. आम्ही लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करण्याचे ठरविले आहे असे ते पुढे म्हणाले.