पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:10 AM2021-02-23T04:10:24+5:302021-02-23T04:10:24+5:30
- दरदिवशी वाढताहेत कोरोना रुग्णांची संख्या : मास्क व सॅनिटायझरकडे दुर्लक्ष, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा नागपूर : गेल्या वर्षी लॉकडाऊननंतर ...
- दरदिवशी वाढताहेत कोरोना रुग्णांची संख्या : मास्क व सॅनिटायझरकडे दुर्लक्ष, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
नागपूर : गेल्या वर्षी लॉकडाऊननंतर उद्योग-व्यवसाय तब्बल तीन ते चार महिने बंद होते. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. अन्य राज्य आणि जिल्ह्यातील कामगारांनी पलायन केल्याने उद्योजकांना उद्योग सुरू करता आले नाहीत. लॉकडाऊन संपूर्ण देशात असल्याने आणि वस्तूंची मागणी कमी झाल्याने अनेक उद्योजकांनी सहा महिन्यांपर्यंत उद्योग सुरू केले नाहीत. दिवाळीपूर्वी उद्योग आणि व्यवसाय हळूहळू रुळावर येऊ लागले. दिवाळीनंतर औद्योगिक वस्तूंना मागणी वाढू लागली आणि व्यावसायिकांची खरेदी वाढली. पण आता पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढू लागताच पुन्हा अपेक्षित लॉकडाऊनच्या भीतीने उद्योजक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यावर मास्क व सोशल डिस्टन्सिंग हाच पर्याय असल्याचे मत उद्योजक-व्यावसायिकांनी व्यक्त केले.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा उद्योग-व्यवसायावर संकट आले आहे. कोरोना कायमच गेल्याच्या तोऱ्यात लोक वावरल्याने पुन्हा कोरोनाने पाय पसरले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येनुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा लॉकडाऊनचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहे. आता उद्योग-व्यवसाय बंद झाल्यास पुन्हा नव्याने सुरू करणे शक्य नाही. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात राज्य शासनाने सवलत देण्याची घोषणा केली होती. पण ती फोल ठरली आहे. उद्योजक व व्यावसायिकांना बँकांचे हप्ते आणि विजेचे बिल व्याजासह भरावे लागत आहे. या सर्व संकटातून सर्व जण बाहेर निघत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वांची चिंता वाढली आहे. लॉकडाऊन करू नये, अशी सर्वांची विनंती आहे. कोरोनावर मात करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग हाच पर्याय आहे आणि त्याचे तंतोतंत पालन करण्यात येत असल्याचे उद्योजक आणि व्यावसायिकांनी सांगितले.
कोरोनाचे एकूण रुग्ण१,४३,१३३
बरे झालेले रुग्ण१,३२,८६१
कोरोना बळी ४२७५
धोका वाढतोय
गेल्या आठवड्यात लग्नसमारंभात गर्दी वाढल्यानेच रुग्ण वाढल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. लग्नकार्यात मनपाच्या पथकाने तपासणी करून ५ ते १० हजारांपर्यंत दंड ठोठावला. पण त्याची भीती न बाळगता आयोजकांनी लग्नकार्य सुरूच ठेवले. कोरोनाची तमा न बाळगता लोकांनीही गर्दी केली.
यात मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. वाढत्या रुग्णांमुळे उद्योजक, व्यावसायिकांसोबत डॉक्टरांचीही चिंता वाढली आहे. राज्य शासन नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहे. वाढता धोका टाळण्यासाठी लोकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे डॉक्टरांचे आवाहन आहे.
उद्योग संघटनांचे प्रतिनिधी म्हणतात...
राज्य शासनाने लॉकडाऊनचे सूतोवाच केल्याने भीती वाढली आहे. संकटातून बाहेर आलेले उद्योग पुन्हा डबघाईस येणार आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांवर लॉकडाऊन पर्याय ठरणार नाही. सर्व उद्योजकांना शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांनी नियमांचे पालन करावे.
प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बीएमए
उद्योग आता कुठे रुळावर येण्यास सुरुवात झाली होती, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उद्योगात मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे उद्योजक आर्थिक संकटात येणार आहे.
चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष, एमआयए
अनलॉकनंतर उद्योगाला गती मिळाली होती. पण कोरोना रुग्ण वाढल्याने उद्योजकांमध्ये भीती पसरली आहे. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास उद्योजक संकटात येणार आहे. रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचे आहे.
अमर मोहिते, अध्यक्ष, कळमना इंडस्ट्रीज असो.