आता वाढेल चिमण्यांचा किलबिलाट; लॉकडाऊन ठरले वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 11:37 AM2021-07-14T11:37:28+5:302021-07-14T11:40:30+5:30

काेराेना काळात लागलेले लाॅकडाऊन चिमण्यांसाठी वरदान ठरले. शुद्ध झालेल्या हवामानामुळे चिमण्यांचे अस्तित्व धाेक्याबाहेर आल्याचा समाधानकारक रिपाेर्ट समाेर आला आहे.

Lockdown secures sparrows' existence | आता वाढेल चिमण्यांचा किलबिलाट; लॉकडाऊन ठरले वरदान

आता वाढेल चिमण्यांचा किलबिलाट; लॉकडाऊन ठरले वरदान

googlenewsNext
ठळक मुद्देदेशात संख्या स्थिर असल्याचा दावातामिळनाडूच्या संस्थेची रिपाेर्ट

 लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : कधी काळी आपल्या अंगणात, घरात चिमण्यांचे बागडणे, त्यांची चिवचिव सामान्य बाब हाेती. त्यांच्या समूहासाेबत मुलांचे खेळणे चालायचे. मात्र हळूहळू ही चिमुकली चिमणी माणसांपासून दूर हाेऊ लागली. बदलत्या जीवनशैलीत चिमण्या शहरात दिसेनाशा झाल्या. मात्र आता एक समाधानकारक रिपाेर्ट समाेर आला आहे. काेराेना काळात लागलेले लाॅकडाऊन चिमण्यांसाठी वरदान ठरले. शुद्ध झालेल्या हवामानामुळे चिमण्यांचे अस्तित्व धाेक्याबाहेर आल्याचे हा अहवाल सांगताे.

मंगळवारी चिमण्यांच्या विषयी एक आनंदाची बातमी मिळाली. तामिळनाडूच्या सालेम ऑर्निथाेलाॅजिकल फाऊंडेशनने नुकतेच केलेल्या अभ्यासानुसार वर्तमान काळात संपूर्ण भारतात चिमण्यांची संख्या स्थिर असून त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलण्याची गरज नाही. लाॅकडाऊनने त्यांच्या अस्तित्वाचे संकट दूर केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. चिमणी ही सर्वात व्यापक स्वरूपात आढळणाऱ्या प्रजातींपैकी एक आहे.

भारताशी जुळलेला इतिहास

- रॉयल सोसायटी ऑफ प्रोटेक्शन ऑफ बर्ड्सच्या रेड लिस्टमध्ये समाविष्ट चिमणीच्या संरक्षणासाठी २००६ मध्ये पहिली बैठक झाली.

- महाराष्ट्राच्या नाशिक येथील रहिवासी ‘द नेचर फॉर सोसायटी ऑफ इंडियन एनवायरनमेंट’ चे संयोजक मोहम्मद दिलावर यांनी चिमणी दिवस साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला व त्याअंतर्गत २० मार्च २०१० चा दिवस निवडण्यात आला.

- जगभरातील देशांनी २० मार्च हा दिवस चिमणी दिवस म्हणून साजरा करण्याचे मान्य केले.

- चिमण्यांची संख्या विविध भाैगाेलिक क्षेत्रात ३० ते ६० टक्क्यांपर्यंत घटल्याचे नमूद करण्यात आले हाेते.

- लॉकडाऊनमुळे पक्ष्यांवर झालेल्या प्रभावाचा अभ्यास केल्यानंतर चिमण्या शहरात पुन्हा दिसायला लागल्या असून त्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

- शहरातील दाट लाेकवस्तीतही हा पक्षी दिसायला लागला आहे. यामुळे चिमण्या ग्रामीण भागापासून दूर राहूनही त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात सक्षम असल्याचा दावा या अभ्यासातून करण्यात आला.

भारतात ६ प्रजातीच्या चिमण्या

भारतात ६ प्रजातीच्या चिमण्या आढळून येतात. शहरी लाेकवस्तीत आढळणारी हाऊस स्पॅराे आहे. याशिवाय इतर प्रजातींमध्ये स्पेनिश स्पॅरो, सिंड स्पॅरो, रूसेट स्पॅरो, डेड सी स्पॅरो आणि ट्री स्पॅरो भारतात विविध क्षेत्रात आढळून येतात.

जगात २६ प्रजाती

जगभरात केवळ अंटार्क्टिका वगळल तर पुरातन निवास म्हणजे मध्य-पूर्व देशांच्यासह उत्तर अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया तसेच सर्व महाखंड, उपखंडात चिमण्यांच्या एकूण २६ प्रजाती आढळून येतात.

- घरगुती चिमण्यांना जीनस- पैसर व फॅमिली- पैसराईड यामध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. तिचे वैज्ञानिक नाव पैसर डाेमेस्टिक्स असे आहे.

- या चिमुकल्या पक्ष्याला ब्रिटिश साम्राज्यादरम्यान जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी पाेहचविण्यात आले.

Web Title: Lockdown secures sparrows' existence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.