लॉकडाऊनमुळे वाचनसंस्कृतीला मिळतेय बळ : ‘कम्युनिटी रिडिंग’चा ट्रेंड वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 11:08 AM2020-04-27T11:08:15+5:302020-04-27T11:08:43+5:30
आजतागायत राज्य लॉकडाऊन आहे. या काळात अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजनांद्वारे विरंगुळा केला. अनेक जण वाचनाकडे वळल्याचे दिसून येते. सध्या ‘कम्युनिटी रिडिंग’चा ट्रेंड याच पार्श्वभूमीवर वाढल्याचे दिसून येत आहे.
प्रवीण खापरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रकोपाच्या भयाने सारे जग लॉकडाऊन झाले. भारतही बंदिस्तावस्थेत आहे. अशा स्थितीत वेळ कसा घालवावा, हा नवा प्रश्न अनेकांपुढे आहे. बंद खोलीत कुटुंबीयांशी बोलून बोलून काय बोलणार किंवा टीव्हीवरील चित्रपट किती बघणार? आॅनलाईन राहून वेळ जाता जात नाही आणि नव्या क्लृप्त्या मनाला तजेला देत नाहीत. अशा स्थितीत पुस्तकेच धावून आल्याचे निदर्शनास येत आहे.
गेल्या २० मार्चपासून आजतागायत राज्य लॉकडाऊन आहे. या काळात अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजनांद्वारे विरंगुळा केला. मात्र, त्यालाही मर्यादा असतात. अनेक जण वाचनाकडे वळल्याचे दिसून येते. सध्या ‘कम्युनिटी रिडिंग’चा ट्रेंड याच पार्श्वभूमीवर वाढल्याचे दिसून येत आहे. वाचकप्रिय नेटिझन्सकडून वेगवेगळ्या पुस्तकांचा पर्याय दिला जात आहे. पीडीएफ प्रकारातील पुस्तके मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे.
‘कम्युनिटी रिडिंग’ झाले सोपे
: मुळात शाळेत असताना गुरुजी प्रत्येक विद्यार्थ्याला एक पुस्तक देत असत. हे पुस्तक दररोज पद्धतीने महिनाभर सगळेच विद्यार्थी वाचून काढत असत. शिवाय, विद्यार्थ्याने वाचलेल्या पुस्तकाचा सारांश इतर विद्यार्थ्यांना भाष्यस्वरूपात सांगण्याचा प्रकारही होता. यालाच ‘कम्युनिटी रिडिंग’ असे म्हटले जाते. बदलत्या काळात वाचनासोबतच हाही प्रकार ºहास पावला होता. लॉकडाऊनमुळे ‘कम्युनिटी रिडिंग’ला बळ मिळत असल्याचे दिसून येते.
वाचनाचे व्हिडीओ अपलोड!
: वसुंधरा दिवस व पुस्तक दिवसाच्या अनुषंगाने अनेक नाट्यसमूहांनी कम्युनिटी रिडिंगअंतर्गत पुस्तक किंवा नाटक वाचून झाल्यावर वाचनातील व्यक्तीला भावलेले अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून फेसबुक, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटरवर शेअर केले जात आहेत.
इतिहासाच्या पुस्तकांना पसंती
: व्यक्तीच्या आवडीनुसार वाचनातील प्रकारांचा समावेश होतो. काहींना भाववाचक, सौंदर्यवाचक तर काहींना ऐतिहासिक, सामाजिक, वैचारिक तर काहींना कल्पनारम्य पुस्तकांची आवड असते. त्या अनुषंगाने इतिहासाची पुस्तके मोठ्या प्रमाणात वाचली जात असल्याचे दिसून येते. सोशल माध्यमांवर अशा पुस्तकांची चर्चाही मोठ्या प्रमाणात रंगली आहे.