लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांनी जोपासला पक्षिनिरीक्षणाचा छंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 12:19 AM2020-05-26T00:19:21+5:302020-05-26T00:21:52+5:30
लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालये आणि शाळा बंद पडल्या असल्या तरी ज्यांनी अंगी छंद लावून घेतला, अशांसाठी मात्र ही पर्वणी ठरली आहे. या लॉकडाऊनमधील सुटीचा सदुपयोग येथील दोन विद्यार्थ्यांनी केला. यातून त्यांनी चिंचवन नाल्याच्या परिसरात ४२ पक्ष्यांची नोंद घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालये आणि शाळा बंद पडल्या असल्या तरी ज्यांनी अंगी छंद लावून घेतला, अशांसाठी मात्र ही पर्वणी ठरली आहे. या लॉकडाऊनमधील सुटीचा सदुपयोग येथील दोन विद्यार्थ्यांनी केला. यातून त्यांनी चिंचवन नाल्याच्या परिसरात ४२ पक्ष्यांची नोंद घेतली.
ओजस आनंद हरकरे आणि त्याचा भाऊ आर्यन अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. येथील चिंचभवन परिसरातील राधाकृष्ण मंदिराजवळील मेहरबाबा कॉलनीत ते राहतात. ओजस दहावीत असून आर्यन पाचव्या इयत्तेत आहे. घरात बसून कंटाळा आल्याने या दोघा भावंडांनी पक्षिनिरीक्षणाचा छंद जडवला. चिचभवन परिसरातील मार्ग तसा वर्दळीचा आहे. येथील नाल्यावर सध्या खोदकाम सुरू आहे. मात्र लॉकडाऊनमुळे हे काम बंद असल्याने हा परिसरात आता शांत असतो. या शांततेच्या वातावरणात सध्या या परिसरात अनेक प्रकारच्या पक्ष्यांची वर्दळ वाढली आहे नवनवीन पक्षी या परिसरात बघावयास मिळत आहेत. त्यामुळे या दोन्ही भावंडांचे कुतूहल जागृत झाले. त्यातून त्यांनी घराच्या खिडकीशी आलेल्या एका पिवळ्या पक्षाचा मोबाईलने फोटो घेतला व कुतूहलापोटी गुगलवर माहिती शोधली असता तो पक्षी महाराष्ट्राचा राजपक्षी हॅलो फुटेड ग्रीन पिजन असल्याचे लक्षात आले. या दोघांचे कुतूहल जागृत झाले. त्यामुळे त्यांनी नाल्याच्या काठावर जाऊन नवीन पक्षी शोधण्याचे काम सुरू केले. घरी असलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून फोटोग्राफी केली. वाईल्ड फोटोग्राफी कशी करावी याचे प्रशिक्षण त्यांनी यूट्यूबवरून घेतले व त्या पक्षांचे सुंदर छायाचित्रे काढली.
मागील पावणेदोन महिन्यात या भावंडांनी या नाला परिसरात येणाºया ४२ पक्ष्यांची नोंद घेतली आहे. यातील अनेक पाहुणे पक्षीदेखील आहेत. लॉकडाऊनमुळे पशुपक्षी निर्भयपणे फिरायला लागले आहेत. यानिमित्ताने ही पक्षी अभ्यासकांसाठी योग्य संधी असल्याचे या घटनेवरून लक्षात येत आहे.