लॉकडाऊनमुळे नागपुरात ३ टन मासे खराब होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:38 PM2020-03-25T23:38:18+5:302020-03-25T23:39:51+5:30
कोरोना वायरसच्या संक्रमणावर ताबा मिळविण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सुरू केले आहे. यामुळे वाहतूक प्रभावित झाल्याने सुमारे ३ टन मासे खराब होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे मत्स्य व्यावसायिकांमध्ये चिंता पसरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना वायरसच्या संक्रमणावर ताबा मिळविण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सुरू केले आहे. यामुळे वाहतूक प्रभावित झाल्याने सुमारे ३ टन मासे खराब होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे मत्स्य व्यावसायिकांमध्ये चिंता पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तीन दिवसापूर्वी नागपुरात विक्रीसाठी पोहचलेला माल व्यावसायिकांनी कसाबसा कोल्ड स्टोअरेजमध्ये सुरक्षित ठेवला होता. मात्र तो पुन्हा काही काळ तसाच ठेवला तर सडू शकतो. त्यामुळे हा माल नष्ट करावा लागणार आहे.
मांस, मासे हा नागरिकांच्या आहाराचा भाग असल्याने या वस्तूंच्या विक्रीसाठी विशेष सूट द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. अन्य भाजीऐवजी हादेखील पर्याय नागरिकांपुढे असावा, यामुळे भाजीबाजारात टंचाई निर्माण होणार नाही, असा मुद्दा व्यापाऱ्यांनी मांडला आहे. प्रशासनाने या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. या मागणीवर अद्याप विचार झालेला दिसत नाही. कलम १४४ लागू असल्याने आणि वाहतुकीच्या सर्व साधनांवर निर्बंध लावण्यात आले असल्याने स्टोअरेजमधील मासे बाजारात विक्रीसाठी आणणेही अवघड झाले आहे. स्थानिक स्तरावर यासंदर्भात काही निर्णय व्हावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. असे असले तरी दुसरीकडे मात्र अनेक नागरिकांनी कोरोनामुळे मांसाहार वर्ज्य केला आहे.