टोळधाडीवर मिळू शकते नियंत्रण : शेतात रात्री किंवा पहाटे फवारणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:44 AM2020-05-27T00:44:44+5:302020-05-27T00:47:36+5:30
जिल्ह्यात काही भागातील पिकावर टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. टोळधाडीचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. टोळ उशिरा रात्री किंवा पहाटे विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझुडपांवर जमा झाले असतात. या कालावधीत शेतकऱ्यांनी फवारणी केल्यास नियंत्रण मिळवता येणे शक्य असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात काही भागातील पिकावर टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. टोळधाडीचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. टोळ उशिरा रात्री किंवा पहाटे विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझुडपांवर जमा झाले असतात. या कालावधीत शेतकऱ्यांनी फवारणी केल्यास नियंत्रण मिळवता येणे शक्य असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
टोळधाड मार्गातील सर्वप्रकारच्या हिरव्या पानांवर हल्ला करून संपवून टाकते. या कीटकांच्या थव्याची व्याप्ती १० किलोमीटर लांब व २ किलोमीटर रुंद इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे. या किडीचे थवे ताशी १२ ते १६ किलोमीटर इतक्या वेगाने उडतात. ही टोळधाड दिवसभर हवेच्या दिशेने उडत जाते. शेतकऱ्यांनी शेतात धूर करणे, ड्रम वाजवून आवाज करणे, फवारणी करणे अशी पावले उचलावीत, असे कृषी विभागाने सांगितले आहे.
काटोलमध्ये ८० लिटर कीटकनाशकाची फवारणी
सदर किडीच्या सामूहिक नियंत्रणासाठी ‘ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेयर’ व अग्निशमन दलाच्या बंबांनी ‘क्लारोपायरीफॉस’ या ८० लिटर कीटकनाशकाची फवारणी काटोल परिसरात करण्यात आली.
हे उपाय करा
शेताच्या आजूबाजूला मोठे चर खोदणे
वाद्य वाजवून मोठ्याने आवाज करणे
धोका असलेल्या शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर करणे
फवारणी करणे
अशी करा फवारणी
टोळधाडीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी आधारित कीटकनाशक ‘अझाडिरेक्टिन’ १५०० पीपीएम ३० मिली किंवा ५ टक्के निंबोळी अर्काची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. २० किलो गहू किंवा भाताच्या तुसामध्ये ‘फिप्रोनिल ५ एससी’ ३ मिली मिसळावे व त्याला शेतात ठिकठिकाणी ठेवावे. याकडे टोळ आकर्षित होतात व ते मरतात.