नागपूर जिल्ह्यात ‘टोळ’चा धुमाकूळ : काटोल, सावनेर, मौदा उपविभाग प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 02:10 AM2020-05-27T02:10:54+5:302020-05-27T02:12:22+5:30
जिल्ह्यातील नरखेड व काटोल तालुक्यात सोमवारी तर कळमेश्वर, सावनेर, कामठी व नागपूर (ग्रामीण) तालुक्यात मंगळवारी वाळवंटीय टोळ (डेझर्ट लोकस्ट)चे थवे मोठ्या प्रमाणात आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील नरखेड व काटोल तालुक्यात सोमवारी तर कळमेश्वर, सावनेर, कामठी व नागपूर (ग्रामीण) तालुक्यात मंगळवारी वाळवंटीय टोळ (डेझर्ट लोकस्ट)चे थवे मोठ्या प्रमाणात आढळून आले. टोळच्या या धूमाकुळामुळे ग्रामीण भगाात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, नियंत्रणासाठी प्रशासन कामाला लागले आहे. सध्या शेतात खरीप किंवा रबी पिके नसल्याने पिकांच्या नुकसानीची शक्यता कमी असल्याची माहिती अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी दिली. मात्र, संत्रा व मोसंबीच्या बागांसह भाजीपाल्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. त्यावर नियंत्रण मिळविणे जिल्हा प्रशासन व कृषी विभागासाठी आव्हानात्मक असून, केवळ जुजबी उपाययोजना केल्या जात आहे.
जिल्ह्यात नरखेड तालुक्यातील ताराउतारा, खलानगोन्द्री व खापा (घुडन) शिवारात सोमवारी सायंकाळी टोळ आढळून आली. ताराउतारा भागातील टोळचे थवे वरूड (जिल्हा अमरावती) तर खापा (घुडन) शिवारातील थवे काटोल मार्गे कळमेश्वर तालुक्याच्या दिशेने निघाले. मंगळवारी ही टोळ कळमेश्वर तालुक्यातील उपरवाही, कोहळी, सावनेर तालुक्यातील खापरखेडा, दहेगाव (रंगारी), कामठी तालुक्यातील कोराडी, लोणखैरी, नांदा, नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील घोगली, गुमथळा (गुमथी) तसेच फेटरी, खडगाव शिवारात आढळून आली.
काही थव्यांच्या स्थलांतराची दिशा नागपूर शहराकडे तर काहींची कामठी व सावनेर शहराकडे होती, अशी माहिती शेतकºयांनी दिली. ती केळवद (ता. सावनेर) शिवारात तसेच मौदा तालुक्यातील काही रेवराल व पारडी शिवारात आढळून आल्याचे काहींनी सांगितले. या टोळने बहुतांश शिवारातील वांगी, भेंडी, टमाटर व इतर भाजीपाल्याच्या पिकांची तसेच संत्रा, मोसंबी, लिंबू, पपईच्या झाडांची पाने मोठ्या प्रमाणात फस्त केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात ४५ वर्षाच्या कालखंडात टोळ पहिल्यांदाच बघायला मिळाली, अशी माहिती कृषी अधिकाºयांनी दिली. यासंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या कीटकशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. राहुल वडस्कर यांनी सांगितले की, तांबूस रंगाचा हा वाळवंटीय टोळ नाकतोडा गटातील आहे. तृणधान्य हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. फळपिकेही त्यांचे खाद्य ठरू शकते. ही टोळ हवेच्या दिशेने प्रवास करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. या टोळच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाकडून कोणत्याही प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.
टोळ नियंत्रण ही सामूहिक जबाबदारी असून, उपाययोजना सोपी आहे. टोळच्या मार्गात ज्यांची शेती आहे, त्यांनी निरीक्षण करावे. त्या दिवसापुरते शेतात उभे राहून काही वाजविले किंवा धूर केल्यास टोळ थांबत नाही. रात्री ती पिकांवर किंवा बागेतील झाडांवर बसणार नाही, याची काळजी घ्यावी. याबाबत शेतकऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सध्या शेतात पीक नसल्याने नुकसान नाही. टोळ खरीप हंगामात आली असती तर नुकसानीचे प्रमाण अधिक असते.
- मिलिंद शेंडे,
अधीक्षक, कृषी अधिकारी, नागपूर.
शेतकऱ्यांनी निरीक्षण करणे गरजेचे आहे. रात्री टोळ जिथे बसेल, तिथे टायर जाळून धूर केल्यास ती नियंत्रणात येऊ शकते. निंबोळी अर्क व काही कीटकनाशकांची फवारणी केल्यास टोळ थांबत नाही. सध्या शेतात पीक नसल्याने आवाज किंवा धूर करून टोळला पळवून लावता येऊ शकते.
- डॉ. राहुल वडस्कर, सहा. प्राध्यापक,
कीटकशास्त्र विभाग, पी.के.व्ही. नागपूर.