नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात टोळधाडीचा प्रवेश; शेतकरी भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:40 PM2020-05-25T17:40:47+5:302020-05-25T17:41:21+5:30
सोमवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान नरखेड तालुक्यातील खलानगोंद्री शिवारात टोळधाड ( नाकतोड्या किड्यांचा हल्ला) झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी भयभीत झाला आहे.या टोळधाड पासून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण कसे करावे याबाबत प्रशासनही चिंतेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सोमवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान नरखेड तालुक्यातील खलानगोंद्री शिवारात टोळधाड ( नाकतोड्या किड्यांचा हल्ला) झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी भयभीत झाला आहे.या टोळधाड पासून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण कसे करावे याबाबत प्रशासनही चिंतेत आहे.
मध्यप्रदेशातून टोळधाड सातपुडा पर्वत मार्गे महाराष्ट्रातील संत्रा उत्पादक मोर्शी तालुक्यात दाखल झाला . तेथून तो वर्धा तालुक्यातील आष्टी भागात पोहचला. आज दुपारी चार वाजताच्या दरम्यान खलानगोंदरी शिवारातील देविदास चौरे यांच्या शेतात आला. तेथून पुढे तारासावंगा शिवाराकडे निघाला.
टोळधाड मध्ये करोडो ,अरबो च्या संख्येने टोळ(नाकतोडे) असतात एकावेळी पाच ते दहा किलोमीटर परिघातील शेकडो एकर शेतजमिनीतील रात्रीच्या वेळी पिकांना हानी पोहोचवते. टोळ सर्व प्रकारच्या झाडांची पाने खातात. झाडाला केवळ खोड ,काड्याच शिल्लक राहतात. सध्या तालुक्यात भाजीपाला व मुख्यत: संत्रा , मोसंबी, लिंबू या झाडांना टोळधाडचा धोका आहे. परिसरात बातमी लिहिपर्यंत काही नुकसान नाही झाले परंतु रात्रभरात किती नुकसान करणार ही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
नरखेड तालुका कृषी अधिकारी डॉ योगीराज जुमडे यांनी टोळधाड पासून बचाव व नियंत्रणाकरिता काही उपाय सांगितले. आगीचा लोळ - टोळधाडीचा शेतावर प्रादुर्भाव झाल्यास आगीचा धूर करावा. मोठा तीव्रतेचा आवाज- शेतात ढोल ताशा ,भांडी ,ट्रॅक्टर चे सायलेन्सर चा मोठा आवाज करावा. रासायनिक औषध फवारणी- टोळधाड समूहाने पिकावर आक्रमण करते, एक समूहात टोळ ची संख्या करोडो मध्ये असते व ती पांच दहा किलोमीटर अंतरावर पसरते . यावर नियंत्रण मिळविण्याकरिता द्रोण द्वारे औषधी फवारणी करावी. क्लोरोपायरीफाँस ५०% साईपरमेथ्रीन५% ३-४ मी. ली. प्रति एक लिटर पाण्यामध्ये मिश्रण बनवून फवारणी करावी. ट्रॅक्टर द्वारे फवारणी- ट्रॅक्टर च्या मागे पॉवर स्प्रे मशिन लावूनही फवारणी केली जाऊ शकते . फवारणी मुळे ५५% नियंत्रण केले जाऊ शकते.
तसेच लँम्डासायलोहेथ्रीन ४०० मी.ली. औषध ६०० लिटर पाण्यात मिसळून सकाळी ७ वाजेपर्यंत फवारणी करावी.