कर्जमाफी, बोंडअळीवरून विधानसभा चार वेळा स्थगित; लक्षवेधी टाळल्याने फुंडकरांना केले लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:52 PM2017-12-13T23:52:51+5:302017-12-13T23:53:42+5:30
शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्या, कापसावरील बोंडअळीची नुकसान भरपाई द्या, अशा घोषणा देत, विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज विधानसभेचे कामकाज चार वेळा स्थगित करण्यात आले. दिवसाच्या कामकाजाची सुरुवात वादळी झाली, पण नंतर दिवसभरासाठीचे कामकाज झाले.
नागपूर : शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्या, कापसावरील बोंडअळीची नुकसान भरपाई द्या, अशा घोषणा देत, विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज विधानसभेचे कामकाज चार वेळा स्थगित करण्यात आले. दिवसाच्या कामकाजाची सुरुवात वादळी झाली, पण नंतर दिवसभरासाठीचे कामकाज झाले.
कामकाज सुरू होताच घोषणाबाजी सुरू झाली. विरोधी पक्षांचे सदस्य वेलमध्ये उतरले. या गदारोळात अध्यक्षांनी कामकाज तीन वेळा स्थगित केले. या गोंधळात प्रश्नोत्तरे मात्र झाली. बोंडअळीच्या प्रश्नाशी संबंधित स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला, तरी विरोधकांनी बोलू देण्याची केलेली विनंती अध्यक्षांनी मान्य केली. ‘चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी ७० लाख शेतक-यांना दिल्याचे म्हटले होते. आजवर किती कर्जमाफी दिली, खरेखोटे राज्याला कळू द्या. मुख्यमंत्री म्हणतात, तसे ‘दूध का दूध पानी का पानी’ होऊ द्या, असे आव्हान राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी दिले.
विदर्भ, मराठवाड्यात कापूस पिकावर पडलेल्या बोंडअळी संदर्भातील लक्षवेधी सूचना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे माहिती न आल्याने पुढे ढकलण्यात येत असल्याचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगताच, विधानसभेत आज विरोधकांनी हल्लाबोल केला.
देशमुखही वेलमध्ये
भाजपामध्ये सध्या बंडखोरीच्या पवित्र्यात असलेले आशिष देशमुख हे बोंडअळीची लक्षवेधी पुढे ढकलल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत वेलमध्ये उतरले.