अजनी इंटर मॉडेल स्टेशन खापरीत लॉजिस्टीक हब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:14 AM2017-09-23T01:14:48+5:302017-09-23T01:15:00+5:30
पुढील ५० वर्षाचा विचार करता अजनी रेल्वे स्थानकाला इंटर मॉडेल स्टेशन आणि खापरीला लॉजिस्टीक हब म्हणून विकसित करण्याबाबतच्या प्रकल्पाची योजना ....
सर्व प्रकारचे सहकार्य करणार : मुख्यमंत्री फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुढील ५० वर्षाचा विचार करता अजनी रेल्वे स्थानकाला इंटर मॉडेल स्टेशन आणि खापरीला लॉजिस्टीक हब म्हणून विकसित करण्याबाबतच्या प्रकल्पाची योजना जागतिक दर्जाची तयार करावी, अशी सूचना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास प्रकल्पाला साकार करण्यासाठी राज्य सरकारतर्फे सर्वप्रकारचे सहकार्य करण्याचे घोषित केले.
महामेट्रोच्यावतीने हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे मल्टीमॉडेल हब विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एनएचएआयतर्फे प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. सुरुवातीला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
भारतमालाचे मुख्य व्यवस्थापक मनोज कुमार यांनी मल्टीमॉडेल हबबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रस्ता वाहतूक आणि माल वाहतुकीच्या दिशेने जे पाऊल उचलायला हवे होते ते झाले नसल्याने नागपूर शहरात वाहतुकीच्या समस्या वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इंटर मॉडेल स्टेशन आणि लॉजिस्टीक हबची योजना बनवण्यात आली आहे. अजनीमध्ये रेल्वेची ४५० एकर जमीन आहे.
तर इंटर मॉडेल स्टेशन (आयएमएस)साठी ५० ते ६० एकर जमिनीची गरज आहे. मेट्रो स्टेशन, रिंग रोडची सुविधा उपलब्ध असल्याने रेल्वे, बस आणि मेट्रो एकाच ठिकाणी प्रवाशांना उपलब्ध होईल. विमानतळाशीही अजनी कनेक्ट आहे. ‘मल्टी लेव्हल पार्किंग’ आणि कमर्शियल कॉम्प्लेक्सचा यात समावेश राहील. त्याचप्रकारे तुरुंगाचीही १५० एकर जागा आहे.
या विषयावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, तरुंग सुद्धा शहराच्या सीमेबाहेर जाणार आहे. तेव्हा या जागेचाही उपयोग होऊ शकतो.
खापरीमध्ये लॉजिस्टीक हबबाबत झालेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की खापरीमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा पार्किंगसाठी मिळू शकते. एचपीसीएल सुद्धा शहराबाहेर जात आहे. अजनी आणि खापरी स्टेशनला इंटर मॉडेल स्टेशन आणि लॉजिस्टीक हब बनवण्यासाठी १४०० कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहितीही यावेळी दिली.
केंद्रीय अर्थसंकल्पात १६०० कोटी रुपयाची तरतूद करण्यात करण्यात आल्याची माहिती मिळताच गडकरी यांनी दोन्ही प्रकल्पासाठी जागतिक स्तरावरील योजना बनवणे आणि यासाठी नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरण आणि नागपूर महानगरपालिका यांचे संयुक्त सहकार्य घेण्याचे निर्देशही दिले. भारत माला प्रकल्पांतर्गत नागपूर ते इंदोर, सूरत, सोलापूर आणि रायपूर हे चार कॉरिडोर जोडण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या सादरीकरणासाठी सर्व आमदार व खासदारांना आमंत्रित करण्यात आले होते.
याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, आ. प्रकाश गजभिये, आ. जोगेंद्र कवाड़े, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, जिलाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त अश्विन मुद्गल, नासुप्र सभापति डॉ. दीपक म्हैसेकर, एनएचएआय प्रोजेक्ट डायरेक्टर चंद्रशेखर, आर.के पांडे, महामेट्रो प्रोजेक्ट डायरेक्टर महेश कुमार, रोलिंग स्टॉक डायरेक्टर सुनील माथुर, फायनान्स डायरेक्टर शिवमाथन, महाप्रबंधक (प्रशासन) अनिल कोकाटे, सुधीर देऊळगावकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मेट्रोने जोडणार
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांना मेट्रोची गरज लक्षात घेऊन मेट्रो रेल्वेच्या दुसºया टप्प्याची योजना तयार करण्याचे निर्देश देत कन्हान, बुटीबोरी, कोराडी आणि कापसीला मेट्रो रेल्वेशी जोडण्यासाठी व्यावसायिक जागा उपलब्ध करून देण्याची माहिती दिली. त्यांनी नवीन कन्हान पुलाच्या बांधकामानुसार योजना तयार करण्याचे निर्देश एनएचएआय आणि महामेट्रोला दिले. यामुळे मेट्रो रेल्वेला नव्याने काम करावे लागणार नाही. त्यातून वेळेची आणि निधीचीही बचत होईल.
तुकडोजी पुतळा ते अजनी चौकापर्यंत उड्डाण पूल
गडकरी यांनी तुकडोजी पुतळा चौकातून वंजारीनगर पाण्याची टाकीमार्गे अजनी चौकापर्यंत नवीन उड्डाण पूल बनवण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी रेल्वेची जमीन उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करण्याची आणि जमीन मिळताच मार्च २०१८ पर्यंत उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्याची घोषणा केली.