स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी लोक जनशक्ती पार्टीची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 10:44 PM2018-02-22T22:44:34+5:302018-02-22T22:53:23+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी लोक जनशक्ती पार्टीतर्फे गुरुवारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी लोक जनशक्ती पार्टीतर्फे गुरुवारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली.
पक्षाचे विदर्भ अध्यक्ष सतीश लोणारे, प्रवक्ता तन्हा नागपुरी यांच्या नेतृत्वात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी विदर्भ राज्य स्थापन न करणाऱ्या राज्य व केंद्र सरकारच्या विरुद्ध जोरदार नारेबाजी करण्यात आली. यासोबतच कोरेगाव भीमा येथील हल्लेखोर भिडे-एकबोटे यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना पाठवण्यात आले.
आंदोलनात रवी त्रिपाठी, प्रेमकुमार मिश्रा, रंजीत साह, वैभव गुप्ता, चंद्रशेखर बरमाटे, अशफाक रहमान, क्लॉडियस पीटर, राहुल थोरात, नाना गजभिये, आनंद कालपांडे आदी कार्यकर्ते व पदादिकारी सहभागी होते.
विदर्भाबाबत भाषिकवाद हा खोडसाळपणा - श्रीहरी अणे
शरद पवार यांनी विदर्भाची मागणी काही हिंदी भाषिक लोक करीत असल्याचे वक्तव्य करून एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. याबाबत विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की ‘विदर्भाबाबत हिंदी-मराठी भाषिकांच्या वर्चस्वाचा वाद’ हा खोडसाळ व पद्धतशीरपणे गैरप्रसार करणारा आहे. विदर्भात हिंदी व मराठी लोकच नव्हे तर बंगाली, छत्तीसगडी, तेलंगी, गोंडी व मारवाडी भाषिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. आम्ही याला आमची समृद्धी समजतो, न्यूनता नव्हे. विदर्भ राज्याची मागणी ही भाषावादावर आधारित नाही. आमच्या मागणीचा थेट संबंध विकासाशी आहे. १९६० ते २०१४ पर्यंत महाराष्ट्राचा एकही मराठी भाषिक मुख्यमंत्री विदर्भाचा विकास करू शकला नाही म्हणून आम्हाला विदर्भ राज्य हवे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार हे विदर्भविरोधीच
शरद पवार यांची भूमिका ही नेहमीच संदिग्ध असून ते विदर्भविरोधीच राहिलेले आहेत. विदर्भात आले की, ते एक बोलतात आणि विदर्भाबाहेर गेले की दुसरेच बोलतात. सत्तेत असतानाही त्यांनी विदर्भावर अन्यायच केला आहे. त्यांची भूमिका विदर्भविरोधी राहिलेली आहे. यामुळे त्यांच्या पक्षालाही विदर्भात वाव मिळाला नाही. त्यांच्या आताच्या वक्तव्याने हा पक्ष विदर्भातून नामशेष होईल. त्यांच्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो.
राम नेवले
मुख्य संयोजक, विदर्भ राज्य आंदोलन समिती