Lok Sabha Election 2019; रामटेकमध्ये ६२ टक्के उमेदवार ‘अंडरग्रॅज्युएट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 10:48 AM2019-04-02T10:48:55+5:302019-04-02T10:50:37+5:30
लोकसभा निवडणुकांत रामटेक मतदारसंघातून उभे असलेले उमेदवार शिक्षणात माघारले असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील ६२ टक्के उमेदवारांनी शिक्षणासाठी महाविद्यालयाचे तोंडदेखील पाहिलेले नाही.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकांत रामटेक मतदारसंघातून उभे असलेले उमेदवार शिक्षणात माघारले असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील ६२ टक्के उमेदवारांनी शिक्षणासाठी महाविद्यालयाचे तोंडदेखील पाहिलेले नाही. ३७ टक्के उमेदवारांचे शिक्षण तर दहावीपर्यंतच झालेले आहेत. नागपूरच्या तुलनेत येथील पदवीधर उमेदवारांचे प्रमाण हे फारच कमी आहे.
निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. यातील १२ टक्के उमेदवार हे आचार्य पदवीधर आहेत. तर तेवढेच उमेदवार हे अनुक्रमे पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. राजकीय पक्षांनी मतदारसंघात एकूण १२ उमेदवार उभे केले आहेत. यापैकी ६६ टक्के उमेदवार हे ‘अंडरग्रॅज्युएट’ आहेत. या आकडेवारीतूनच राजकीय पक्षांची उदासीनता दिसून येत आहे.
विविध गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या काही मतदारसंघात दिसून येत असताना, रामटेकमध्ये मात्र याबाबत सकारात्मक चित्र आहे. या मतदारसंघातील एकाही उमेदवारावर कुठलाही गुन्हा किंवा न्यायालयीन खटला दाखल नाही.
६८ टक्के उमेदवार मतदार संघाबाहेरील
रामटेक मतदारसंघात थोडेथोडके नव्हे तर ६८ टक्के उमेदवार हे मतदारसंघाबाहेरील आहेत. त्यांचे निवासस्थान हे नागपूर येथील असून मतदानदेखील नागपुरातच आहे. केवळ १२ टक्के उमेदवार रामटेक मतदारसंघाच्या हद्दीतील आहेत. विशेष म्हणजे राजकीय पक्षांमधील ८२ टक्के उमेदवार हे रामटेक मतदारसंघातील रहिवासी नाहीत. तर अपक्षांमध्ये हेच प्रमाण ४० टक्के इतके आहे.
उमेदवारांचे सरासरी वय पन्नासच
रामटेक मतदारसंघातील उमेदवारांचे सरासरी वय हे पन्नास वर्ष इतके आहे. तेथील सर्वात तरुण उमेदवार हा २९ वर्षांचा आहे तर सर्वात वयस्क उमेदवार ७० वर्षांचे आहेत. रामटेकमधील ३८ टक्के उमेदवारांचे वय हे ५० हून कमी आहे. तर १९ टक्के उमेदवार हे चाळीशीच्या आतील आहेत. ३८ टक्के उमेदवार हे साठीहून अधिक वयाचे आहेत. राजकीय पक्षांचे ७२ टक्के उमेदवार हे पन्नासहून अधिक वयाचे आहेत.