Lok Sabha Election 2019; नाराज मतदारच बसपाची ताकद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:22 AM2019-03-30T11:22:46+5:302019-03-30T11:23:08+5:30
या लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्यांक समाज व अ़नुसूचित जातीचे मतदार प्रमुख पक्षांना नक्कीच धडा शिकवतील. हलबा समाजाची मतंही बसपाकडे येतील, असा विश्वास बहुजन समाज पक्षाचे उमेदवार मोहम्मद जमाल यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉंग्रेस व भाजपाच्या धोरणांमुळे अल्पसंख्यांक समाजावर नेहमीच अन्याय होत आला आहे. या लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्यांक समाज व अ़नुसूचित जातीचे मतदार प्रमुख पक्षांना नक्कीच धडा शिकवतील. हलबा समाजाची मतंही बसपाकडे येतील, असा विश्वास बहुजन समाज पक्षाचे उमेदवार मोहम्मद जमाल यांनी व्यक्त केला. कॉंग्रेस व भाजपाने मुस्लिम व अनुसूचित जातींमधील मतदारांचा अपेक्षाभंग केला आहे. एका पक्षाने त्यांना ‘व्होटबँक’ समजून घेतले तर दुसऱ्या पक्षाने त्यांच्यासाठी काहीच केले नाही. या पक्षांच्या धोरणांशी नाराज असलेले मतदार हेच बसपाची ताकद बनतील, असे मत नागपूर लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षातर्फे मैदानात उतरलेल्या मोहम्मद जमाल यांनी व्यक्त केले आहे. यावेळी बसपाच्या रणनीती संदर्भात त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
बसपाच्या ‘सोशल इंजिनिअरिंग’अंतर्गत नागपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवार बनविण्यात आले आहे. देशात एकता, शांती कायम ठेवणे तसेच संविधान वाचविण्यासारख्या मुख्य मुद्यांना घेऊन बसपा मतदारांजवळ जात आहे. कॉंग्रेस व भाजपासारख्या पक्षांनी अल्पसंख्यांक व अनुसूचित जातीच्या लोकांशी चांगला व्यवहार केलेला नाही. या निवडणुकीत मतदार मतांच्या माध्यमातून याचे उत्तर देतील, असे मोहम्मद जमाल यांनी सांगितले.
अल्पसंख्यांकांवर अन्याय, स्थानिक मुद्यांवर करणार प्रचार
बसपा राष्ट्रीय पातळीवर प्रचारादरम्यान संविधानाच्या संरक्षण आणि सामाजिक समतेच्या मुद्यावर प्रचार करणार आहे तर नागपूर लोकसभा मतदारसंघातील प्रचारात शहरातील मूलभूत समस्या व स्थानिक मुद्दे यांच्यावर भर देण्यात येईल. विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी मनपाच्या नगरसेवकांना स्थानिक पातळीवर निधीची कमतरता जाणवते. असे मुद्दे प्रचारात समोर आणण्यात येतील, असे मोहम्मद जमाल यांनी सांगितले.
अशी मिळाली संधी
आतापर्यंत बसपातर्फे नागपुरातून ‘सोशल इंजिनिअरिंग’अंतर्गत विविध समाजाच्या लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी कोणत्या समाजाचे प्रतिनिधी जास्त मतं मिळवू शकतो याची पक्षाकडून माहिती घेण्यात आली. त्यानंतरच मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मी मागील १५ वर्षांहून अधिक काळापासून बसपासोबत जुळलेला आहे. त्यामुळे मलाच संधी देण्यात आली, अशी माहिती मोहम्मद जमाल यांनी दिली.