Lok Sabha Election 2019; निवडणूक असायची त्यांच्यासाठी दिवाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 03:27 PM2019-03-22T15:27:46+5:302019-03-22T15:29:55+5:30

निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. या उत्सवात रंग भरण्यासाठी मध्य भारतात नागपूर ही मोठी बाजारपेठ होती.

Lok Sabha Election 2019; Election is to be Diwali for them! | Lok Sabha Election 2019; निवडणूक असायची त्यांच्यासाठी दिवाळी!

Lok Sabha Election 2019; निवडणूक असायची त्यांच्यासाठी दिवाळी!

Next
ठळक मुद्देआज हातालाही काम नाहीनागपूर होते मध्य भारतातील प्रचारसाहित्याची बाजारपेठ

मंगेश व्यवहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. या उत्सवात रंग भरण्यासाठी मध्य भारतात नागपूर ही मोठी बाजारपेठ होती. इतवारी, गांधीबाग, महाल या भागात निवडणुकांचा खरा माहोल राहायचा. बेरोजगारांना रोजगार मिळायचा. कलावंतांना कामापासून फुरसत नसायची. राजकीय नेते, कार्यकर्त्यांच्या चर्चांचे फड रात्रभर चालायचे. निवडणुकीचे साहित्य बनविण्याचे काम सहा महिन्यापूर्वीपासून सुरू व्हायचे. त्याकाळच्या निवडणुका, तेव्हाच्या प्रचाराचा माहोल जाणून घेण्याचा प्रयत्न लोकमतच्या प्रतिनिधीने केला. तेव्हा लक्षात आले की, कधी निवडणुका त्यांच्यासाठी दिवाळी असायच्या आज त्यांच्या हातालाही काम राहिले नाही.
१९९० च्या दशकात मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांनी आदर्श आचारसंहिता निवडणुकीच्या प्रक्रियेत लागू केली. त्यामुळे निवडणूक खर्च, पोस्टर्स, बॅनर्स, भिंती रंगविणे यावर बंदी आली. प्रत्येक निवडणुकीत किती खर्च करायचा याची मर्यादा उमेदवारांना बांधून दिली. त्यातच प्रिंटिंग तंत्रज्ञानासोबतच निवडणूक प्रक्रियेतच आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास झाला. त्यामुळे निवडणुकीत प्रचाराचे साहित्य बनविणारे कलावंत, पेंटर, मिस्त्री, प्रिंटर्स, रबर स्टॅम्प मेकर, डेकोरेशनचे साहित्य पुरविणारे व्यावसायिक, सायकलरिक्षा चालक यांच्या व्यवसायावर अवकळा आली.
पूर्वी हे व्यावसायिक निवडणुकीच्या काळात किती व्यस्त असायचे यासंदर्भात लोकमतने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गांधीबागेतील एम.गोपाल आर्ट नावाने अतिशय प्रसिद्ध असलेले मार्कं डे हे पेंटर निवडणुकीच्या काळात उमेदवाराच्या प्रचारासाठी बॅनर्स, कटआऊट्स बनवायचे. निवडणुकीची घोषणा झाल्याबरोबर ते कामाला लागायचे. मजूर, मिस्त्री, पेंटर, लेटर लिहणारे, कटआऊट कापणारे असे जवळपास २० ते २५ लोक दिवसरात्र काम करायचे. त्यामुळे प्रचाराच्या साहित्यासाठी उमेदवार, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या रात्री उशिरापर्यंत मैफिली भरायच्या. खायला फुरसत नव्हती एवढे काम त्यांच्याकडे असायचे. त्यांनी इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी, शरद पवार यांचे ५० फुटाचे कटआऊट्स तेव्हा जाहीर सभेसाठी तयार केले. आज निवडणुकीचे उमेदवार घोषित झाले आहे. प्रचार सुरू झाला आहे. पण त्यांच्याकडे कुठलेही काम नाही. एम. गोपाल आर्टचे मालक गणेश मार्कं डे म्हणाले की, आचारसंहितेमुळे हे सर्व वैभव हरविले आहे.

आचारसंहितेने सर्व काही हिरावले
निवडणुका आल्या की प्रिंटर्सचा व्यवसाय जोरात रहायचा. महाल परिसरात तर वर्दळच असायची. बॅनर्स, पोस्टर्स, बिल्ले, स्टीकर, पॉम्पलेट, कागदी झेंडे, जाहीरनामा मोठ्या संख्येने छापले जायचे. आशा आॅफसेटचे मिलिंद येवले हे त्यांच्या वडिलांपासून या व्यवसायात आहेत. त्यांच्याकडे तर बॅलेट पेपरसुद्धा छापले जात होते. तेव्हा आॅफसेटला पोलिसांची सुरक्षा असायची. तेव्हा पक्षाचे उमेदवार उमेदवारी घोषित झाल्याबरोबर पहिले काम प्रचार साहित्य निर्मितीचे करायचे. पूर्वी निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षाच्या चिन्हांचे तोरण बांधले जायचे. आचारसंहितेमुळे काहीच राहिले नाही. राजकीय पक्षाच्या उमेदवारांना तर प्रचार साहित्य पक्षाकडूनच पुरविल्या जाते. त्यामुळे निवडणुकीच्या काळात व्यवसायाला जो बहार यायचा, तो संपला आहे. फ्लेक्समुळे तर पूर्ण व्यवसायच संपला आहे. निवडणुकीच्या काळात कधीकाळी गुंजणारा थ्रेडर मशीनचा आवाज आता शांत झाला आहे.

एका निवडणुकीतून कमवायचो पाच वर्षाचे उत्पन्न
चिटणीस पार्क चौकात भारत रबर स्टॅम्प आहे. ८५ वर्षापासून ते या व्यवसायात आहे. निवडणुकीच्या काळात येथे बॅलेट पेपरवर मारण्यात येणाऱ्या फुली बनायच्या. त्यावेळी २५ पोते फुली त्यांच्या येथून जायच्या. जिल्हा प्रशासन त्यांच्याकडून खरेदी करायचे. मतपेट्यांना लागणारे सील त्यांच्याकडे बनायचे. निवडणुकीच्या काळात भिंतीवर पेंटिंग करण्यासाठी टेन्सील बनायच्या. अख्खे कुटुंब या कामात व्यस्त असायचे. निवडणूक म्हणजे त्यांच्यासाठी उत्पन्नाचे मोठे स्रोत होते. एका निवडणुकीतून पाच वर्षाचे उत्पन्न मिळवित असल्याचे भारत रबर स्टॅम्पचे संचालक कृष्णा वैद्य यांनी सांगितले. आचारसंहिता आणि निवडणूक प्रक्रियेत आलेल्या आधुनिकतेमुळे आज काहीच उरले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Lok Sabha Election 2019; Election is to be Diwali for them!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.