Lok Sabha Election 2019; नागपूर जिल्ह्यात लाखावर विद्यार्थ्यांनी केले मतदानासाठी प्रोत्साहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:55 AM2019-03-30T10:55:36+5:302019-03-30T11:02:24+5:30
येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण मतदान करू अशी ग्वाही नागपूर जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३४ हजार पालकांनी आपल्या पाल्यांमार्फत सरकारला दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकशाहीच्या मजबुतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून ‘सिस्टीमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अॅण्ड इलेक्ट्रोरल पार्टीसिपेशन’ (स्विप) उपक्रम राबविण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले होते. या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेत, त्यांना पालकांना मतदानासाठी प्रेरित करायचे होते. सुरुवातीला जिल्ह्यातून या उपक्रमाला केवळ दोन तालुक्यातूनच प्रतिसाद मिळाला होता. यासंदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर, या उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण विभागाकडे विचारणा केली. त्यानंतर या कामाला वेग आला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण मतदान करू अशी ग्वाही जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३४ हजार पालकांनी आपल्या पाल्यांमार्फत सरकारला दिली आहे.
लोकशाहीच्या मजबुतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत शहर-ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात आले. या उपक्रमात जिल्ह्यातील १ लाख ४० हजार ३२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून एकूण १ लाख ३४ संकल्पपत्रे भरून आणली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी मतदानाची टक्केवारी ही सरासरीपेक्षा गेल्या काही दिवसांपासून खालावत आहे. ही मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता नैतिक पद्धतीने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालक मतदान करतील, असे संकल्पपत्र प्रत्येक शालेय विद्यार्थ्याकडून भरून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिल्या होत्या.