Lok Sabha Election 2019; नागपुरात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट होतेय सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 10:36 AM2019-04-01T10:36:37+5:302019-04-01T10:37:06+5:30
लोकसभेसाठी नागपूर व रामटेक मतदारसंघात घेण्यात येणाऱ्या मतदानाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा संघनिहाय मतदानासाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएम मशीन तसेच व्हीव्हीपॅट यंत्र ठेवण्यासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूमची सुरक्षितता तसेच मतदानासाठी मतपत्रिका लावून यंत्र सज्ज ठेवण्यासाठी राजकीय पक्षांच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आवश्यक तयारी करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी रविवारी दिले आहेत.
लोकसभेसाठी नागपूर व रामटेक मतदारसंघात घेण्यात येणाऱ्या मतदानाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. अश्विन मुदगल यांनी विधानसभा मतदार संघनिहाय तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूमसह मतदानासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्राचे वाटप तसेच मतदानानंतर स्वीकारण्यासाठी करावयाच्या व्यवस्थेची पाहणी करून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक सूचना केल्यात.
उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघासाठी उर्सुला गर्ल्स हायस्कूल येथे मतदान संदर्भातील संपूर्ण व्यवस्था करण्यात आली असून स्ट्राँग रूममध्ये विशेष सुरक्षेत मतदान यंत्र ठेवण्यात आले आहेत. मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाºयांसाठी प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून बचत भवन येथे झोनल अधिकारी व सहायक झोनल अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. उत्तर, पश्चिम व पूर्व विधानसभा मतदार संघात राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमोर मतदार यंत्र सज्ज ठेवण्याच्या प्रक्रियेला २ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. मतदान यंत्रावर उमेदवारांचे छायाचित्र असलेली मतपत्रिका राहणार असून व्हीव्हीपॅटवर सुद्धा त्यानुसार माहिती अपलोड करण्याला सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया ४ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येईल. इतर तीन मतदारसंघात ५ एप्रिल ते ७ एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करुन मतदानासाठी मतदान यंत्र सज्ज राहणार आहेत. राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमोरच सज्ज असलेल्या मतदान यंत्रांपैकी मॉक पोल घेऊन मतदान प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असल्याची खात्री करून देण्यात येणार आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाºयांना मतदान यंत्रासह आवश्यक सर्व फॉर्मसह माहिती उपलब्ध करुन देण्यात असून मतदानासाठी मतदान केंद्रनिहाय पथक तयार करण्यात येऊन त्यांना आवश्यक सूचना देण्यात येणार आहे. या व्यवस्थेचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी आज घेतला. पूर्व मतदारसंघासाठी ईश्वर देशमुख महाविद्यालय, दक्षिण मतदारसंघासाठी बचत भवन, दक्षिण-पश्चिम मतदारसंघासाठी कुर्वेज मॉडेल स्कूल तसेच ग्रामीण पोलीस मुख्यालय तसेच हैदराबाद हाऊस येथे निवडणूक विषयात साहित्याचा पुरवठा तयार करण्यासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या कक्षाची पाहणी जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी केली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा उपस्थित होत्या. विधानसभा मतदारसंघनिहाय करण्यात आलेल्या व्यवस्थेसंदर्भात सहायक निवडणूक अधिकारी सुजाता गंधे, व्ही.व्ही.जोशी, ज्ञानेश भट्ट, जगदीश कातकर, शिरीष पांडे, शीतल देशमुख यांनी माहिती दिली.