Lok Sabha Election 2019; बसपाच्या हत्तीची गडावर कशी असेल चाल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 11:17 AM2019-03-29T11:17:27+5:302019-03-29T11:18:39+5:30
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघात गत तीन निवडणुकीत बसपाच्या मतांचा ग्राफ वाढला आहे. मात्र प्रत्येकवेळी उमेदवार बदलत गेल्याने बसपाच्या हत्तीला रामटेकचा गड सर करताना धाप लागली आहे.
जितेंद्र ढवळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघात गत तीन निवडणुकीत बसपाच्या मतांचा ग्राफ वाढला आहे. मात्र प्रत्येकवेळी उमेदवार बदलत गेल्याने बसपाच्या हत्तीला रामटेकचा गड सर करताना धाप लागली आहे. २०१४ मध्ये ९५ हजार ५१ मते मिळविणाऱ्या किरण रोडगे (पाटणकर) यावेळी वंचित बहुजन आघाडीत सामील झाल्याने बसपाला याही वेळी रामटेकमध्ये नवा उमेदवार शोधावा लागला. सुभाष गजभिये यांना बसपाने यावेळी संधी दिली आहे. त्यामुळे कॅडरबेस मतांवर विश्वास ठेवणाऱ्या बसपाच्या हत्तीची रामटेकच्या गडावर यावेळी चाल कशी असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
२०१९ मध्ये बसपाचा ग्राफ वाढेल की वंचित बहुजन आघाडी त्यांच्या मतांना खिंडार पाडेल याबाबतही राजकीय पोलपंडितांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र मागील तीन निवडणुकात बसपाने रामटेकमध्ये काँग्रेसचा बीपी वाढविला आहे हे नाकारता येणार नाही.
१९८० मध्ये काशीनाथ करडे हे रामटेकमध्ये बसपाचे पहिले उमेदवार होते. करडे यांची टक्कर काँग्रेसचे जतिराम बर्वे यांच्याशी होती. बर्वे यांनी एकूण मतांच्या ७१.५१ टक्के मिळवित (२ लाख ७३ हजार ९५७) विक्रमी विजय मिळविला. करडे यांना केवळ १,२३७ मतावर थांबावे लागले.
१९८९ मध्ये मा.म.देशमुख यांना बसपाने उमेदवारी दिली. त्यांची टक्कर काँग्रेसचे पी.व्ही.नरसिंहराव यांच्याशी होती. नरसिंहराव दुसऱ्यांदा रामटेकच्या मैदानात होते. नरसिंहराव यांना या निवडणुकीत जनता दलाचे पांडुरंग हजारे यांनी घाम फोडला. हजारे यांना २ लाख २३ हजार ३३० मते मिळाली. नरसिंहराव २ लाख ५७ हजार ८०० मते मिळवित विजयी झाले. मात्र मा.म. देशमुख यांना १५ हजार ८५१ मतावर समाधान मानावे लागले. मात्र १९८० च्या तुलनेत बसपाची येथे मते वाढली.
१९९१ मध्ये बसपाने मा.म.देशमुख यांना पुन्हा संधी दिली. यावेळी त्यांची लढत भोसल्यांशी होती. काँग्रेसचे तेजसिंहराव भोसले यांनी २ लाख ४० हजार ४३७ मते मिळवित गडावर स्वारी केली. देशमुख यांना १२ हजार ३९३ मतावरच थांबावे लागले. १९८९ च्या तुलनेत बसपाला येथे ३ हजार ४५८ मते कमी मिळाली.
१९९८ मध्ये राम हेडाऊ यांना बसपाने रामटेकच्या रणभूमीत उतरविले. हेडाऊ यांची लढाई काँग्रेसच्या चित्रलेखा भोसले यांच्याशी झाली. राणींनी ३ लाख २५ हजार ८८५ मते मिळवित गड सर केला तर हेडाऊ ३० हजार ९४९ मतावर थांबले. मात्र बसपाने या निवडणुकीत गतवेळच्या तुलनेत जास्त मते मिळविण्याचा विक्रम हेडाऊ यांच्या माध्यमातून स्थापन केला.
१९९९ मध्ये बसपाने रामटेकमध्ये उमेदवार बदलला. अशोक इंगळे यांना संधी देण्यात आली. इंगळे यांची टक्कर सेनेचे सुबोध मोहिते यांच्याशी झाली. २ लाख ४२ हजार ४५४ मते मिळवित मोहिते यांनी गड सर केला. मात्र १९९८ च्या निवडणुकीत मतात आघाडी घेणाºया बसपाची गडावर घसगुंडी झाली. बसपाचे इंगळे यांना १६ हजार ७०६ मतांवर समाधान मानावे लागले. २००४ मध्ये बसपाने प्रा.चंदनसिंग रोटेले यांना संधी दिली. त्यांची टक्कर सेनेचे सुबोध मोहिते आणि काँग्रेसचे श्रीकांत जिचकार यांच्यासोबत होती. येथे २ लाख ७६ हजार ७२० मते मिळवित मोहिते १४ हजार १०२ मतांनी विजयी झाले. रोटेले यांना ५५ हजार ४२३ मते मिळाली. बसपाला ५५ हजाराहून अधिक मते मिळाल्याने काँग्रेसचे जिचकार यांचा पराभव झाला, हे विशेष.
२००९ मध्ये बसपाने प्रकाशभाऊ टेंभुर्णे यांना संधी दिली. यावेळी त्यांची टक्कर काँग्रेसचे मुकुल वासनिक आणि सेनेचे कृपाल तुमाने यांच्याशी होती. ३ लाख ११ हजार ६१४ मते मिळवित वासनिक ही निवडणूक जिंकले मात्र बसपाने ६२ हजार २३८ मते घेत वासनिक यांना घाम फोडला. सेनेचे तुमाने यांनी २ लाख ९४ हजार ९१३ मते मिळाली. वासनिक यांनी सेनेकडून गड काबीज केला मात्र बसपाने येथे मतांचा ग्राफ वाढविला.
२०१४ मध्ये किरण रोडगे (पाटणकर) यांच्या माध्यमातून बसपाने येथे पुन्हा नवा चेहरा दिला. रोडगे यांचा काँग्रसचे मुकुल वासनिक आणि सेनेचे कृपाल तुमाने यांच्याशी सामना होता. देशात मोदी लाट असताना रामटेकमध्ये बसपाने ९५ हजार ०५१ मते मिळविली. सेनेचे तुमाने विजयी झाले. मात्र बसपाचा ग्राफ वाढला.