Lok Sabha Election 2019; प्रबोधनाचे माध्यम झाले प्रचाराचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 11:57 AM2019-04-07T11:57:05+5:302019-04-07T11:58:29+5:30

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने आता वेग धरला असून सूर्यासोबत समाजातील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांच्या प्रचाराने जोर धरला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जात आहे.

Lok Sabha Election 2019; The medium of awakening is the means of preaching | Lok Sabha Election 2019; प्रबोधनाचे माध्यम झाले प्रचाराचे साधन

Lok Sabha Election 2019; प्रबोधनाचे माध्यम झाले प्रचाराचे साधन

Next
ठळक मुद्देपथनाट्य वेधते लोकांचे लक्ष कलावंतांना रोजगार, कला दाखविण्याची संधी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने आता वेग धरला असून सूर्यासोबत समाजातील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांच्या प्रचाराने जोर धरला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जात आहे. अशात प्रबोधनाच्या चळवळीच्या रूपात उदयास आलेले पथनाट्य आज राजकीय पक्षांच्या प्रचाराचे साधन झाले आहे.
पथनाट्याबाबत लोकांमध्ये आकर्षण आहे. या आकर्षणाचा राजकीय लाभ उमेदवारांकडून उचलला जाणे सहाजिक आहे. एखाद्या उमेदवारांची जाहीर सभा किंवा प्रचार करताना लोकांचे लक्ष वेधून वातावरण निर्मितीसाठी पथनाट्य प्रभावी ठरत असल्याने विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांतर्फे प्रचारासाठी पथनाट्याचा वापर केला जात आहे. तसा पथनाट्य माध्यमाचा प्रभावी वापर बसपाने १०-१२ वर्षापूर्वी चालविला होता. मात्र २०१९ च्या निवडणुकीत प्रचाराच्या विविध माध्यमांमध्ये पथनाट्य हेही अनुकूल ठरत आहे.
पथनाट्य कला प्रबोधनासाठी उपयोगात येत असल्याने व्यावसायिकतेची बाब यात नव्हती. कधीतरी शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी काम केले तरच शासकीय अनुदान मिळणे तेवढाच काय तो भाग. मात्र या निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी उपयोग होत असल्याने आर्थिक लाभही कलावंतांना मिळत आहे. पथनाट्याच्या एका ग्रुपमध्ये १२ ते १५ कलावंत सहभागी असतात. एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराकडे दोन ते तीन ग्रुप ठरविण्यात आले असून यात ४०-४५ कलावंतांना काम मिळाले आहे. यात मानधन किंवा आर्थिक मिळकत किती ही बाब स्पष्ट होऊ शकली नाही. चित्रपट, मालिका व नाटकांच्या क्षेत्रात गेल्या २९ वर्षापासून काम करणारे नचिकेत म्हैसाळकर यांना शहरातील एका बड्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पथनाट्य बसविण्याची जबाबदारी मिळाली आहे. त्यांनी सांगितले की महिनाभरापूर्वी याची तयारी करण्यात आली. यामध्ये प्रचारगीत तयार करण्यापासून संगीताचाही वापर करण्यात आला आहे. त्यांच्या पथनाट्यात पहिल्यांदा नृत्याचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्या पक्षासाठी काम करीत आहोत ही बाब गौण आहे, मात्र या माध्यमातून कलावंतांना रोजगार मिळाला असून हजारो नागरिकांसमोर कला सादर करण्याची संधी मिळाली. अ‍ॅड. गौरव खोंड यांनी पथनाट्याचे लेखन केले आहे तर चारुदत्त जिचकार यांनी संगीत दिले आहे. पथनाट्याचे दोन ते तीन ग्रुप या कलेतून संबंधित उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध उमेदवारांकडून पथनाट्य सादरीकरणासाठी आॅफर येत असल्याने नाट्यक्षेत्रातील कलावंतांची मागणी वाढल्याची माहिती आहे.
मात्र एखाद्या उमेदवाराच्या प्रचारासाठी साजेसे नाटक लिहणे, ते कलावंतांसह बसविणे आणि संगीताच्या माध्यमातून सादर करणे, याला वेळ लागत असल्याने अनेक उमेदवारांचा पथनाट्याद्वारे प्रचार करणे शक्य नाही. मात्र सध्यातरी नितीन गडकरी यांच्या प्रचारात पथनाट्याचा प्रभावी वापर होत असल्याचे दिसून येत आहे. तरीपण आपआपल्या परीने या कलेचा वापर प्रचारासाठी केला जात आहे.

कला प्रबोधनासाठी आहे, प्रचारासाठी नाही
पथनाट्याच्या क्षेत्रात चर्चित नाव असलेल्या पल्लवी जीवनतारे यांना प्रचारनाट्य बसविण्याची मागणी करण्यात आली. मात्र राजकीय उमेदवाराच्या प्रचाराचा भाग होण्यास त्यांनी नकार दिला. डॉ. बाबासाहेबांचे विचार व संविधान प्रबोधनासाठी पथनाट्य चळवळ चालविणाऱ्या पल्लवी यांना यातून रोजगार मिळत असल्याची बाब मान्य नाही. प्रबोधनासाठी किंवा मतदान जागृतीसाठी निस्वार्थपणे कला सादर करण्यास तयार आहे, पण प्रचारासाठी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गेली अनेक वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत असलेले बौद्ध रंगभूमीचे संजय जीवने यांनी, ‘बुद्ध व बाबासाहेबांच्या विचारांसाठी पथनाट्य करतो, उमेदवारांच्या प्रचारासाठी नाही’, असे स्पष्ट केले. व्यावसायिकीकरण मान्य नसल्याचे सांगत १०-१२ दिवसांसाठी काम मिळाले म्हणजे रोजगार मिळाला असे म्हणणे चुकीचे आहे. हा डोंबाऱ्याचा खेळ ज्यांना करायचा आहे त्यांनी करावा, असे रोखठोक मत त्यांनी मांडले. बहुजन रंगभूमीचे वीरेंद्र गणवीर यांनीही नकारात्मक मत मांडले. एका राजकीय पक्षाकडून बोलावणे होते पण प्रचारासाठी नकार कळविल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Lok Sabha Election 2019; The medium of awakening is the means of preaching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.