Lok Sabha Election 2019 : नागपुरात ६२ टक्के, तर रामटेकमध्ये ५६ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 09:04 PM2019-04-11T21:04:56+5:302019-04-11T21:08:02+5:30
नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात निवडणुकांतील पहिल्या टप्प्याचे मतदान गुरुवारी पार पाडले. प्रचंड उकाडा असतानादेखील निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार नागपुरात जवळपास ६२ टक्के मतदान झाले, तर रामटेकमध्ये ५६ टक्के मतदान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात निवडणुकांतील पहिल्या टप्प्याचे मतदान गुरुवारी पार पाडले. प्रचंड उकाडा असतानादेखील निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार नागपुरात जवळपास ६२ टक्के मतदान झाले, तर रामटेकमध्ये ५६ टक्के मतदान झाले.
या दोन्ही मतदारसंघात सकाळी ७ वाजताच मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास मतदार संघांमध्ये गर्दी दिसून आली. मात्र उन्हाचा कडाका वाढल्यावर दुपारी मात्र मतदान केंद्रांमध्ये मतदारांची संख्या कमी झाली होती. नागपूरमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत नागपूरमध्ये ३८.३५ टक्के तर रामटेकमध्ये ४४.५५ टक्के मतदान झाले होते. दुपारी ४ नंतर परत मतदारांची पावले मतदान केंद्रांकडे वळायला लागली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत नागपूरमध्ये ५५.१३ टक्के तर रामटेकमध्ये ५१.७२ टक्के मतदान झाले होते.
दरम्यान, मतदार याद्यांमधून नाव गहाळ होण्याचा अनुभव याही लोकसभा निवडणुकीत आला. दोन्ही मतदार संघांमध्ये मतदार याद्यांमध्ये नाव नसल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी ‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’ मशीनचा तांत्रिक घोळ झाल्याने मतदानाला विलंब झाला. मात्र दोन्ही मतदार संघात कुठलीही अनुचित घटना घडली नाही व शांततेत मतदान पार पडले. नागपूरमध्ये भाजपाचे नितीन गडकरी व काँग्रेसचे नाना पटोले तर रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने व काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यात मुख्य लढत असल्याचे चित्र होते.
‘व्हीआयपी’ मतदारांचे मतदान
दरम्यान नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री व भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना उमेदवार व खा. कृपाल तुमाने, काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले, किशोर गजभिये यांनीदेखील मतदान केले. यावेळी मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात होती.