Lok Sabha Election 2019; नागपूर व रामटेकचे उमेदवार म्हणतात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:21 AM2019-03-26T10:21:27+5:302019-03-26T10:22:00+5:30
नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी जनसामान्यांसाठी ते काय करणार आहेत, याविषयी जे मनोगत व्यक्त केले ते थोडक्यात देत आहोत..
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी जनसामान्यांसाठी ते काय करणार आहेत, याविषयी जे मनोगत व्यक्त केले ते थोडक्यात देत आहोत..
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार
मी निवडणुकीसाठी अर्ज भरत असताना नागपूरच्या जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, हे एकाप्रकारे त्यांचे माझ्यावरील प्रेमच आहे. मागील वेळेपेक्षा माझा विजय जास्त मताधिक्याने होईल असा मला विश्वास आहे. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात रालोआला प्रचंड बहुमत मिळेल व मागील वेळपेक्षा जास्त जागांवर आमचा विजय होईल. जनतेने मला समर्थन दिले यासाठी त्यांचे आभार. त्यांच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा व विकासाच्या आशा आहेत, त्या मी पूर्ण करेल.
- नितीन गडकरी, भाजपा उमेदवार, नागपूर
लोकशाहीत मतदारच सर्वश्रेष्ठ
लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारंवार काँग्रेसबद्दल मतभेद असल्याबाबत गैरप्रचार करण्यात आला होता. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने काहीच केले नाही. गेल्या पाच वर्षांतच विकास झाला, असे चित्र निर्माण केले जात आहे. आज सर्व कार्यक र्ते जोमाने कामाला लागले आहेत. काँग्रेस आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आल्याने ताकद वाढली आहे. लोकशाहीत मतदारच सर्वश्रेष्ठ असतो.
- नाना पटोले, काँग्रेस उमेदवार, नागपूर
आपले कामच बोलणार
मागील पाच वर्षांत आम्ही रामटेक मतदारसंघाच्या विकासासाठी केलेले काम जनतेने पाहिले आहे. त्यामुळे निवडणुकांत ते कामच बोलेल व जनता परत शिवसेना-भाजप महायुतीवरच विश्वास टाकेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जनतेपर्यंत आम्ही जात आहोत. रामटेकच काय पण राज्यात महायुतीला अपेक्षेहून जास्त जागा मिळतील.
- कृपाल तुमाने, शिवसेना उमेदवार, रामटेक
शेतकरी, बेरोजगारी विकास हेच मुद्दे
विकासाच्या अनेक गोष्टी केल्या जातात. परंतु रामटेकमध्ये कुठेच विकास दिसत नाही. शेतकरी, बेरोजगारी आणि विकास हेच आपले प्रमुख मुद्दे राहतील. रामटेकमध्ये केवळ शिवसेना आणि काँग्रेस अशी थेट लढत राहील. सेनाबद्दल प्रचंड विरोध आहे, ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे.
-किशोर गजभिये, काँग्रेस उमेदवार, रामटेक
विकास नव्हे गती झाली
आमची लढत थेट भाजपसोबत आहे. भाजप विकास होत असल्याचे सांगते. परंतु गतीने विकास होण्याऐवजी विकासाचीच गती झाली आहे. या विकासाने नागरिकांची वाट लावली असून, हेच आपल्या प्रचाराचे मुद्दे राहतील.
- मो. जमाल, बसपा उमेदवार, नागपूर
बेरोजगारी विकास हाच मुद्दा
रामटेक हे मोठे क्षेत्र आहे. या शहराचा विकासच झालेला नाही. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. विकास आणि बेरोजगारी हे आपल्या प्रचाराचे दोन मुख्य मुद्दे राहतील. हे मुद्दे घेऊनच आम्ही जनतेसमोर जाऊ.
सुभाष गजभिये, बसपा उमेदवार, रामटेक
आम्हीच देणार सक्षम पर्याय
जनता आता काँग्रेस आणि भाजपला त्रासली आहे. त्यामुळे आता जनतेला वंचित बहुजन आघाडीच्या रूपात नवा सक्षम पर्याय आम्ही निर्माण करून दिला आहे. त्यामुळे जनता आम्हालाच साथ देईल.
- सागर डबरासे, वंचित बहुजन आघाडी, उमेदवार, नागपूर
बेरोजगारीसह अनेक मुद्दे
रामटेकमध्ये बेरोजगारीसह अनेक स्थानिक मुद्दे आहेत. विकासाच्या नावावर केवळ बोंब आहे. बंद केलेल्या शाळा, महिलांना नि:शुल्क शिक्षण आदी मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाऊ. आमची थेट लढत
शिवसेनेसोबतच राहील.
- किरण पाटणकर-रोडगे, वंचित बहुजन आघाडी, उमेदवार, रामटेक