Lok Sabha Election 2019; नागपूर मनपा मुख्यालयात आचारसंहितेचे खुलेआम उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 10:56 AM2019-03-28T10:56:42+5:302019-03-28T10:57:37+5:30
निवडणूक आचारसंहिता लागू होताच राजकीय पक्ष व शासकीय योजनांशी संबंधित बॅनर, पोस्टर व होर्डिंग हटविले जाते. परंतु महापालिका मुख्यालयात बसपाचे उमेदवार मो.जमाल यांच्या कक्षापुढे त्यांच्या नावाची पाटी पक्षाच्या चिन्हासह अजूनही कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणूक आचारसंहिता लागू होताच राजकीय पक्ष व शासकीय योजनांशी संबंधित बॅनर, पोस्टर व होर्डिंग हटविले जाते. विकास कामांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या नावाच्या कोनशिला, फलक झाकले जातात. शासकीय कार्यालयातही नावाच्या पाट्या असल्यास त्या काढल्या जातात. परंतु महापालिका मुख्यालयात बसपाचे उमेदवार मो.जमाल यांच्या कक्षापुढे त्यांच्या नावाची पाटी पक्षाच्या चिन्हासह अजूनही कायम आहे.
महापालिकेत बसपाचे दहा नगरसेवक आहेत. मो. जमाल हे गटनेते असल्याने त्यांना महापालिका मुख्यालयात कक्ष देण्यात आला आहे. कक्षाबाहेर त्यांच्या नावाची पाटी व त्यावर पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. २५ मार्चला बसपाकडून मो.जमाल यांनी नागपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आपल्या नावाची पाटी हटविणे आवश्यक होते.
यासंदर्भात महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही राजकीय पक्षाचा उमेदवार असलेल्या नगरसेवकांनी वा पदाधिकाऱ्यांनी आपल्या कक्षापुढील नावाची पाटी काढणे वा झाकणे आवश्यक असल्याचे सांगितले. जमाल यांनी नावाची पाटी झाकली नसल्यास ती झाकली जाईल किंवा हटविण्यात येईल. आचारसंहितेच्या कालावधीत शासकीय मालमत्तेच्या माध्यमातून कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार व्हायला नको, असेही धामेचा म्हणाले.