Lok Sabha Election 2019; तुरुंगातील कैदीही करू शकतील मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:06 PM2019-04-02T12:06:52+5:302019-04-02T12:08:58+5:30
मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजवावा, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. त्यासाठी जनजागृती मोहीमसुद्धा राबवली जात आहे.
आनंद डेकाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजवावा, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. त्यासाठी जनजागृती मोहीमसुद्धा राबवली जात आहे. परंतु ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही लोकांना प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत तुरुंगात पाठवले जाते. अशा लोकांचे काय? असा प्रश्न निर्माण होतो. मात्र या लोकांना खरेच मतदान करायचे असेल तर त्यांनाही मतदान करता येते. निवडणूक आयोगातर्फे तशी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु अशा लोकांना मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भात मागणी करावी लागले. त्यानुसार त्यांना पोस्टल बॅलटने मतदान करता येईल.
सैन्यदलातील कर्मचारी-अधिकारी आणि पोलीस तसचे निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावता येतो. पहिल्या टप्प्यातील निवडणुका ११ एप्रिल रोजी होत आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूर आणि रामटेक लोकसभेसाठीही मतदान होणार आहे. यासाठी पोस्टल बॅलेट पाठवण्याची तयारी सुद्धा सुरू झाली आहे. यंदा पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक पेस्टल बॅलेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नागपूर जिल्ह्यात पोस्टल मतदान करण्यासाठी आतापर्यंत ३८७९ लोकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यात सैन्यदलातील २५६९ लोक असून पेलीस विभागातील १३१० लोक आहेत.
यामध्ये नागपूर लोकसभेसाठी सैन्यदलातील ८७९ तर पोलीस विभागातील ९२५ मतदार, तर रामटेक लोकसभेसाठी सैनदलातल १६९० व पोलीस विभागातील ३९५ मतदारांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाने एकूण सात प्रकारच्या लोकांना मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भात गाईड लाईन दिलेले आहेत. यात सैन्य दल पोलीस व निवडणूक कामात तैनात कर्मचाऱ्यांचा समावेश आहेत. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईमुळे तुरुंगात असलेल्या व्यक्तिलाही मतदान करता येऊ शकते. इतकेच नव्हे तर विशेष मतदान करण्याची सोयसुद्धा आहे. यात सैन्यदलातील व्यक्तीला एखाद्या वेळी विशेष बाब म्हणून त्याच्या पत्नीद्वारे मतदानाचा हक्क बजावता येऊ शकते, हे विशेष.
५ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
निवडणुकीतील कामात तैनात व्यक्ती, सैन्यदल तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुरुंगात पाठवण्यात आलेले व्यक्ती आदींना मतदान करायचे असेल तर त्यांना ५ एप्रिलपर्यंत तशी मागणी करता येईल. ५ एप्रिलपर्यंत मागणी करणाऱ्यांना पोस्टल बॅलेट त्यांच्या पत्त्यावर पाठवले जातील. त्याद्वारे मतदान करून ते परत आपल्या मतदार संघातील निवडणूक अधिकाºयांच्या नावाने पाठवावे लागेल.