Lok Sabha Election 2019; राहुल गांधी यांची सभा आणि प्रियांकाचा ‘रोड शो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:57 AM2019-04-01T11:57:00+5:302019-04-01T11:59:51+5:30
अ. भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची नागपुरात जाहीर सभा होत आहे तर पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांचा ‘रोड शो’ करून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याची तयारीही काँग्रेसने चालविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अ. भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची नागपुरात जाहीर सभा होत आहे तर पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांचा ‘रोड शो’ करून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याची तयारीही काँग्रेसने चालविली आहे.
काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता कस्तूरचंद पार्कवर राहुल गांधी यांची सभा होईल. पक्षातर्फे अधिकृतरीत्या सभेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, या संदर्भात एसपीजीने काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज, सोमवारी दुपारी विमानतळावर बैठक बोलाविली आहे. सोबतच सभेच्या आयोजनासाठी आवश्यक त्या सूचनाही रविवारी रात्री देण्यात आल्या आहेत.
प्रियांका गांधी यांचा नागपुरात ‘रोड शो’ द्यावा, अशी मागणी शहर काँग्रेसने अ.भा. काँग्रेस कमिटीकडे केली होती. संबंधित मागणी मान्य होण्याची चिन्हे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ७ एप्रिल रोजी प्रियांका गांधी यांचा ‘रोड शो’ होण्याची शक्यता आहे.
मात्र, जाणकारांच्या मते नागपुरात राहुल गांधी यांची सभा झाल्यानंतर लगेच तीन दिवसांनी प्रियांका गांधी यांचा ‘रोड शो’ असे दोन मोठे कार्यक्रम लावणे कठीण जाईल. असा परिस्थितीत एकतर सभा किंवा ‘रोड शो’ यापैकी कोणताही एक पर्याय निवडला जाऊ शकतो.
५ रोजी चंद्रपूर व वर्धेतही सभा
प्राप्त माहितीनुसार राहुल गांधी हे ५ एप्रिल रोजी एकाच दिवशी चंद्रपूर व वर्धा येथे सभा घेण्याची शक्यता आहे. प्रदेश काँग्रेसकडून तशा सूचना आल्या आहेत. राहुल गांधी हे ४ एप्रिल रोजी दुपारी नागपुरात येतील. सायंकाळची सभा आटोपून पुणे येथे परत जातील. त्यानंतर पुन्हा ५ एप्रिल रोजी ते आधी चंद्रपूर आणि नंतर वर्धेची सभा करतील व रात्री दिल्लीला परततील, अशी माहिती आहे.