Lok Sabha Election 2019; रामटेकमध्ये दोन तुमाने, दोन गजभिये मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:01 AM2019-03-27T11:01:00+5:302019-03-27T11:04:02+5:30
रामटेकच्या रणभूमीत यावेळी दोन तुमाने मैदानात उतरले आहेत. यासोबत दोन गजभिये यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सारख्या आडनावामुळे रामटेकची निवडणूक यंदाही चर्चेत राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : रामटेकच्या रणभूमीत यावेळी दोन तुमाने मैदानात उतरले आहेत. यासोबत दोन गजभिये यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सारख्या आडनावामुळे रामटेकची निवडणूक यंदाही चर्चेत राहणार आहे. तुमाने आणि गजभिये यांना टक्कर देण्यासाठी वासनिकही रामटेकमध्ये दंड थोपटणार आहेत.
२०१४ च्या निवडणुकीत दोन तुमाने आणि दोन वासनिक यांच्यात रामटेकच्या रणभूमीत लढत झाली होती. यात दोन वासनिक आणि एक तुमाने पराभूत झाले होते. यावेळी दोन तुमाने आणि दोन गजभिये यांच्यात लढत होत आहे.
सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. यात सोमवारी २२ तर आधीचे दोन अशा एकूण २४ उमेदवारांचे उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. यात शिवसेनेतर्फे कृपाल बालाजी तुमाने, अपक्ष म्हणून गोपाल अजाबराव तुमाने आणि कांतेश्वर खुशालजी तुमाने यांनी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी छाननीत गोपाल तुमाने यांचा अर्ज बाद झाला. मात्र २८ मार्च (उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस) रोजी लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
रामटेकमध्ये काँग्रेसचे महासचिव राष्ट्रीय मुकुल वासनिक यांनी निवडणूक लढावी, अशी काही कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र ते यंदा रामटेकच्या मैदानात नाही. मात्र गतवेळचे अपक्ष उमेदवार गौैतम वासनिक यावेळीही नशीब अजमावत आहे. २०१४ मध्ये त्यांना ६ हजार ३०४ मते मिळाली होती.
काँग्रेसने यावेळी माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली आहे. तुमाने आणि गजभिये यांना टक्कर देण्यासाठी यावेळी बसपाच्या हत्तीवर सुभाष गजभिये स्वार झाले आहेत. बसपाच्या गतवेळच्या उमेदवार किरण पाटणकर यावेळी वंचित बहुजन आघाडीतर्फे नशीब अजमावीत आहे.
एकाची माघार तर तिघांचे अर्ज बाद
तीन तुमाने, दोन गजभिये उमेदवार असलेल्या रामटेकमध्ये शेंडे आडनावाच्या दोन उमेदावारांनी अर्ज सादर केले होते. यात पीपल्स पार्टी आॅफ इंडिया (डेमोक्रॅटिक)चे सचिन भीमराव शेंडे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर गोंडवाना गणतंत्र पार्टीतर्फे दीपचंद गजानन शेंडे यांचा अर्ज छाननीत बाद झाला. यासोबत गोपाल तुमाने आणि मीनाताई करणसिंह मोटघरे यांचे अर्ज छाननीत बाद झाले आहे.
सध्या २० उमेदवार रिंगणात
रामटेकसाठी एकूण २४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यात एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे तर तिघांचे अर्ज बाद झाल्याने सध्या २० उमेदवार रिंगणात कायम आहेत.