Lok Sabha Election 2019; ‘व्हॉटस्अ‍ॅप’ प्रचारावर ‘कंट्रोल’च नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 10:32 AM2019-04-09T10:32:57+5:302019-04-09T10:34:26+5:30

यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये कधी नव्हे ते ‘सोशल मीडिया’ला उमेदवारांकडून जास्त महत्त्व देण्यात येत आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘फेसबुक’सह विविध माध्यमांतून प्रचार करण्यात येत आहे.

Lok Sabha Election 2019; There is no control over 'Whatsapp' campaign | Lok Sabha Election 2019; ‘व्हॉटस्अ‍ॅप’ प्रचारावर ‘कंट्रोल’च नाही

Lok Sabha Election 2019; ‘व्हॉटस्अ‍ॅप’ प्रचारावर ‘कंट्रोल’च नाही

Next
ठळक मुद्दे मुदत संपल्यानंतरदेखील प्रचार सुरूच राहणार तपासणी यंत्रणाच नाही

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये कधी नव्हे ते ‘सोशल मीडिया’ला उमेदवारांकडून जास्त महत्त्व देण्यात येत आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘फेसबुक’सह विविध माध्यमांतून प्रचार करण्यात येत आहे. उमेदवारांच्या ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर बारीक लक्ष ठेवणार असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. मात्र प्रत्यक्षात ‘व्हॉट्सअ‍ॅप’सारख्या ‘अ‍ॅप’वरील प्रचारावर नजर ठेवण्यासाठी ‘सायबर सेल’ तसेच आयोगाकडे यंत्रणाच उपलब्ध नाही. अशा स्थितीत पहिल्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर मतदानापर्यंत नियमांना धाब्यावर बसवून ‘सोशल मीडिया’वर प्रचाराचा धुरळा उडतच राहण्याची चिन्हे आहेत. या प्रचारावर आयोग लक्ष ठेवणार तरी कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.
निवडणुकांत उमेदवारांच्या ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर बारीक नजर राहणार असल्याचा इशारा निवडणूक आयोगाने दिला होता. यासंदर्भात लक्षदेखील ठेवण्यात येत असून त्याच्या खर्चाची आकडेवारीदेखील उमेदवार आयोगाकडे सादर करत आहेत. विविध संकेतस्थळांसोबतच ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर सर्वात जास्त प्रचार होताना दिसून येत आहे. या माध्यमातून एकाच वेळी कमी खर्चात जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचणे शक्य असल्याने अनेक उमेदवारांची प्रचार यंत्रणा यावर भर देत आहे. उमेदवारांच्या ‘सोशल मीडिया हॅडलर्स’ तसेच कार्यकर्त्यांकडून विविध ‘ग्रुप’ तयार करण्यात आले आहे व दररोज शहरातील लाखो लोकांपर्यंत विविध ‘ग्रुप्स’च्या माध्यमातून संदेश पोहोचत आहेत. निवडणूक आयोगाने ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे.
मात्र ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील संदेशांची चाचपणी करणे ही कठीण बाब आहे. शिवाय उमेदवारांचे कार्यकर्ते, प्रचार यंत्रणा लक्षात घेता प्रत्येकाच्या फोनमधील ‘व्हॉट्सअ‍ॅप’ची तपासणी करणे शक्यच नाही. ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर नेमक्या कुठल्या संदेशांची देवाणघेवाण होत आहे, यावर लक्ष ठेवण्याची यंत्रणा आयोगाकडे नाही. मात्र प्रचार यंत्रणेतून, कार्यकर्ते, नातेवाईक यांच्या माध्यमातून ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर प्रचाराची रणधुमाळी सुरूच राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘सायबर सेल’च्या उपायुक्त श्वेता खेडकर यांना संपर्क केला असता त्या बैठकीत असल्याने त्यांनी बोलण्यास नकार दिला.

‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील संदेश पाहणे अशक्य
‘फेसबुक’, ‘टिष्ट्वटर’ इत्यादी ‘सोशल मीडिया’ हे खुल्या ‘प्लॅटफॉर्म’वर असतात. म्हणजेच कुणीही यावरील संदेश, माहिती पाहू शकतो. मात्र ‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील संदेश ही अशक्य बाब आहे. ‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील व्यक्तिगत संदेश हे ‘एन्ड टू एन्ड एनक्रिप्शन’ने संरक्षित केले असतात. म्हणजेच संदेश पाठविणारा व ज्याच्या क्रमांकावर संदेश जात आहे याव्यतिरिक्त इतर व्यक्ती हे संदेश पाहू शकत नाही. शिवाय एखाद्या उमेदवाराच्या नावाने एकाहून जास्त ‘सीमकार्ड’ व स्मार्टफोन असतील तर एकाच वेळी अनेक ‘व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप’ तो तयार करू शकतो. अशा स्थितीत मतदानाच्या दिवशी प्रचार सुरू असला तरी त्याला ‘ट्रॅक’ करू शकणार नाही, असे मत सायबर तज्ज्ञ अ‍ॅड. महेंद्र लिमये यांनी व्यक्त केले.
पोलिसांकडेही यंत्रणा नाही
नागपूर पोलिसांच्या ‘सायबर सेल’कडे एखाद्याच्या ‘व्हॉटस्अ‍ॅप’वरून किती संदेश चालले आहे, हे सांगणारी यंत्रणा उपलब्ध नाही. केवळ एखाद्या ‘ग्रुप’वर संदेश आला असेल आणि आपला क्रमांक त्यात असेल तर कुणी संदेश पाठविला, हे कळू शकते. मात्र प्रत्यक्ष वैयक्तिक क्रमांकाचे ‘ट्रॅकिंग’ करणे शक्य नसल्याचे ‘सायबर सेल’चे ‘एपीआय’ विशाल माने यांनी स्पष्ट केले. मात्र ‘बल्क एसएमएस’कडे आमचे पूर्ण लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Lok Sabha Election 2019; There is no control over 'Whatsapp' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.