Lok Sabha Election 2019; हजारो मतदार ओळखपत्रापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 01:44 PM2019-03-25T13:44:08+5:302019-03-25T13:47:09+5:30
मतदार ओळखपत्र वाटपाबाबत कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे यंदाही हजारो नागरिक मतदार ओळखपत्रापासून वंचित राहिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १८ वर्षावरील एकही व्यक्ती मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून निवडणूक आयोग विविध अभियान राबवित असते. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसादही लाभतो. नाव नोंदवले जाते. मतदार ओळखपत्र मतदाराच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. परंतु कित्येक मतदारांपर्यंत मतदार ओळखपत्र पोहचतच नाही. अनेक वर्षांपासूनचा हा अनुभव यंदाही मतदारांच्या वाट्यास आला आहे. नवीन मतदार कार्डबाबतही तोच अनुभव आला आहे. मतदार ओळखपत्र वाटपाबाबत कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे यंदाही हजारो नागरिक मतदार ओळखपत्रापासून वंचित राहिले आहेत.
नागपूरसह देशात लोकसभेच्या १७ व्या सार्वत्रिक निवडणूकीला सुरुवात झाली आहे. एकीकडे इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे तर दुसरीकडे मतदार यादीत नाव आहे का? असल्यास त्यामध्ये त्रुटी आहेत का? याची खातरजमा सुरू आहे. यासह नवमतदार ओळखपत्र मिळविण्यासाठी चौकशी करीत आहेत. पण, नव्या मतदारांना गेल्या आठवड्यापासून ओळखपत्रे दिली जात आहेत.
ही ओळखपत्रे पाहिल्यावर अनेकांना ही ओळखपत्रच आहे का याची आश्चर्याने खात्री केल्याचे दिसून आले. कारण नवी ओळखपत्रे रंगीत आहेत. तसेच त्याचा आकार लहान आहे. एखाद्या बँकेच्या डेबिट कार्डसारखी त्याची रचना करण्यात आली आहे.
जिल्ह्यात ४ लाख ६६ हजारावर मतदारांना हे नवे मतदानकार्ड वाटप सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात मतदारांपर्यत ही ओळखपत्रे पोहोचवण्याची जबाबदारी ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर आहे, ते आपले काम व्यवस्थित करीत नसल्याचे दिसून आले आहे. अनेक नवमतदारांना त्यांचे मतदान ओळखपत्र आले. याची देखील माहिती नाही. मात्र, ते ओळखपत्र संबंधित मतदान केंद्रावरील शिक्षक अथवा संबंधित कर्मचाऱ्यांकडे असल्यानंतरही संबंधित मतदाराला कळविले जात नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.
जिल्ह्यातील नुतन १ लाख ८३ हजार मतदारांना एटीएम कार्डसारखे स्मार्ट कलर ओळखपत्र वाटपाचे काम सुरू आहे. तर यापूर्वी २.८३ हजार मतदारांना हे स्मार्टकार्ड वाटप करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. हे काम शिक्षकांच्या व निवडणूक कर्मचाºयांच्या माध्यमातून सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात अनेकांना हे कार्ड मिळालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
यातील कुणाला तुम्ही ओळखता का?
मतदाराला त्याचे मतदान कार्ड (ओळखपत्र) घरपोच किंवा मतदान केंद्रावर बोलावून त्याला सुपूर्द करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र, ज्यांच्याकडे याची जबाबदारी आहे ते मतदाराला ओळखपत्र आले याची तर कल्पना देतच नाही. उलट कुणी आपले मतदार कार्ड आले का, अशी विचारणा करण्यास गेले तर त्याला आपल्याकडील ४०-५० मतदार कार्ड देऊन यातील कुणाला तुम्ही ओळखता का? जर ओळखत असाल, तर त्यांचे मतदान कार्ड तुम्ही त्यांच्याकडे पोहचवून द्या, अशी अजब युक्ती लढविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.
अनेकांना कित्येक वर्षांपासून मतदान ओळखपत्रच नाही
आजही शहरात व जिल्ह्यात असे अनेक मतदार आहेत, की ज्यांनी गेल्या चार-पाच वर्षापूवीपासूनच मतदार ओळखपत्रासाठी नाव दिले (फार्म भरला). मात्र, त्यानंतरही त्यांच्याकडे ते ओळखपत्र आजवर आले नाही. या लोकांचे नाव मतदार यादीत असून त्या यादीत त्यांचे छायाचित्रही आहेत. मात्र, मतदार ओळखपत्र मतदारापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी असलेले शिक्षक अथवा इतर शासकीय कर्मचाºयांकडून याचे वाटपच झाले नसल्याचेही तितकेच वास्तव आहे. तसेच छायाचित्र नाही, असे मतदारही मोठ्या प्रमाणावर आहेत.